भारताचा राज्यकारभार धर्मावर नव्हे तर संविधानानुसार चालतो
By Admin | Published: September 8, 2016 12:47 AM2016-09-08T00:47:15+5:302016-09-08T00:47:15+5:30
आजही अशिक्षित, मध्यमवर्गिय ग्रामीण तथा शहरातील नागरिकांना भारताचा राज्यकारभार कोणत्या आधारे चालतो याची माहिती नाही.
नुतन माळवी : संविधान व पर्यावरण जनजागृती प्रबोधन मोहीम
वर्धा : आजही अशिक्षित, मध्यमवर्गिय ग्रामीण तथा शहरातील नागरिकांना भारताचा राज्यकारभार कोणत्या आधारे चालतो याची माहिती नाही. कारण राज्यकर्त्यांनी सर्वसामान्यपर्यंत भारतीय राज्यघटनेची माहिती पोहचू दिली नाही. देशाचा राज्यकारभार हा धर्मग्रंथाद्वारे नव्हे तर संविधानानुसार चालतो, असे मत सत्यशोधक महिला प्रबोधिनिच्या संस्थापक प्रा. नुतन माळवी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या सहकार्याने संविधान व पर्यावरण जनजागृती प्रबोधन यात्रा काढण्यात आली. स्थानिक अनेकांत स्वाध्याय मंदिर येथून यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी मार्गदर्शक म्हणून माळवी बोलत होत्या.
संविधान हाच सर्व भारतीयांचा गं्रथ होय. जाती-धर्माच्यावर जावून आम्ही सर्व फक्त भारतीय आहो, अशी शिकवण धार्मिक ग्रंथ नव्हे तर भारतीय संविधान देते, असे परखड मत त्यांनी यावेळी मांडले.
ही यात्रा बोरगाव मेघे, सेलुकाटे, वायगाव (नि.), वडद अशी जाऊन देवळी येथील बाजार चौकात समारोप करण्यात आला. यावेळी दादाराव मुन, आयटकचे राज्यकार्याध्यक्ष दिलीप उटाणे उपस्थित होते. मोहिमेत किसान अधिकार अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, सुरेश बोरकर, वर्षा म्हैसकर, शारदा झामरे, अविनाश सोमनाथे यांनी मार्गदर्शन केले. गजेंद्र सुरकार यांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. संजय भगत, भिससेन गोटे, अजय मोहोड, आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)