ग्रामीण रुग्णालय निरुपयोगी
By admin | Published: May 16, 2017 01:13 AM2017-05-16T01:13:55+5:302017-05-16T01:13:55+5:30
मालवण पॅटर्न प्रमाणे ३ कोटी रुपये खर्चून सुसज्ज उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय निरुपयोगी ठरत आहे.
तीन कोटींचा खर्च वाया: कर्मचारी भरण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
अमोल सोटे। लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : मालवण पॅटर्न प्रमाणे ३ कोटी रुपये खर्चून सुसज्ज उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय निरुपयोगी ठरत आहे. येथे गत तीन वर्षांपासून एकही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दिला नाही. लोकप्रतिनिधी देखील डोळ्यावर पट्टी बांधून असल्याचे दिसते. यामुळे ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे.
२५ हजार लोकसंख्येचे आष्टी शहर, त्यालाच लागून ६ हजार लोकसंख्याचे नवीन आष्टी व पेठअहमदपूर या दोन गावांचा संबंध. यासह तालुक्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सन २००९ साली २१ खाटांचे ग्रामीण रुग्णालय राज्य शासनाने मंजूर केले. बांधकामही लवकर झाले. मात्र याठिकाणी एकही आस्थापना देण्यात आली नाही. प्रत्येक सभेत जिल्हा शल्यचिकित्सक सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून कारभार सुरू आहे ना, अशी समजूत काढतात. नंतर कर्मचारी देवू असे सांगतात.
आर्वी विधानसभा मतदार संघात आष्टी तालुक्याच्या राजकारणावर सर्व काही विसंबून आहे. येथील आजी-माजी आमदार विकासकामासाठी चढाओढ करतात. मग ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी का धडपड करीत नाही, असा सवाल सर्वसामान्यांचा आहे.
डझनभर पुढारी मीपणा मिरवितात
जनतेच्या सेवेसाठी शासनाला जाग आणण्याचे काम का करीत नाही. नुसतेच वाद घालत बसण्यापेक्षा समाजोपयोगी कामे करण्याची अपेक्षा गावकरी करीत आहेत. ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरू करा. अन्यथा आष्टीकर लोकप्रतिनिधी आणि शासनाला धडे शिकविल्याशिवाय राहणार नाही, एवढे मात्र खरे!