झुडपांच्या विळख्यातील ग्रामीण रस्ते धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:03 AM2018-01-07T00:03:08+5:302018-01-07T00:03:21+5:30
ग्रामीण भागाचा विकास व्हावा, त्यांची शहरांशी नाळ जुळली जावी म्हणून अनेक योजनांतून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते; पण त्या रस्त्यांची देखभाल, दुरूस्ती व्यवस्थित केली जात नाही. परिणामी, सदर रस्ते झुडपांच्या विळख्यात सापडून अपघाताचे कारण ठरतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण भागाचा विकास व्हावा, त्यांची शहरांशी नाळ जुळली जावी म्हणून अनेक योजनांतून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते; पण त्या रस्त्यांची देखभाल, दुरूस्ती व्यवस्थित केली जात नाही. परिणामी, सदर रस्ते झुडपांच्या विळख्यात सापडून अपघाताचे कारण ठरतात. सध्या जिल्ह्यात अनेक रस्त्यांना असे बकाल स्वरूप आल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भाग जोडण्यासाठी अनेक रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे; पण त्या रस्त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. देवळी तालुक्यातील कोळोणा, दहेगाव (धांदे) यासह अन्य गावांतील रस्त्यांना सध्या झुडपांचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. परिणामी, समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होतात. हा प्रकार वाढीस लागल्याने ग्रामीण नागरिक त्रस्त आहेत. याकडे लक्ष देत झुडपे कापणे गरजेचे झाले आहे.
झाडांच्या फांद्यामुळे अपघातांना निमंत्रण
कोळोणा(चोरे)- वाटखेडा ते कोळोणा (चोरे) मार्गावर दोन्ही बाजुला देवबाभुळीची झाडे आहे. त्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या असून अपघाताला निमंत्रण देत आहे. त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. कोळोणा ते वाटखेडा हा मार्ग अंदोरी मार्गाला जोडल्या गेला आहे. या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण अती आहे. यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता या मार्गाचा वापर प्रवासी करतात. त्या प्रवाशांना झाडांच्या फांद्यांचा आता त्रास होतो. याच मार्गाची काही ठिकाणावर दुरवस्था झाली आहे. खड्डे व फांद्यामुळे अपघात वाढीस लागले आहे. दोन वाहने समोरासमोर आल्यास मोठी अडचण निर्माण होते. या वाढलेल्या फांद्यांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष पुरवून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तातडीने तोडण्यात यावी अशी मागणी आहे.