साध्वी प्रज्ञासिंगच्या विधानाचे जिल्ह्यातही पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 09:35 PM2019-04-26T21:35:05+5:302019-04-26T21:35:43+5:30
शहीद हेमंत करकरे व भारतीय पोलीस सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या विधानाचे जिल्ह्यातही पडसाद उमटले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना, वीर अशोक सम्राट संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहीद हेमंत करकरे व भारतीय पोलीस सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांबद्दल साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरच्या विधानाचे जिल्ह्यातही पडसाद उमटले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना, वीर अशोक सम्राट संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध केला.
शहीद हेमंत करकरे यांनी राष्ट्रासाठी अतिरेक्यांशी लढताना प्राणांची आहुती दिली. आज ते शहीद म्हणून देशातील प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत आदरणीय आहेत. राष्ट्राने सर्वोच्च अशा वीरचक्र पुरस्काराने त्यांनी सन्मानित केले. बॉम्बस्फोटातील आरोपी प्रा सिंग हिने आक्षेपार्ह विधान करून शहिदांचा अपमान केला. या विधानाचा पोलीस अधिकारी, कर्मचारी संघटनेने निषेध करून साध्वी प्रज्ञा सिंग हिला देशद्रोही घोषित करण्याची मागणी निवेदनातून केली. यावेळी सुरेश बोरकर, हरिगणेश वांदिले, अंकुश पिंपळे, संजय कापसे, व्यंकट बुंदे, रमेश गुरनुले उपस्थित होते. वीर अशोक सम्राट संघटनेने मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिला भाजपने भोपाळ लोकसभेकरिता उमेदवारी दिल्याबद्दल संताप व्यक्त करीत नामांकन रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली. यावेळी जिल्हाध्यक्ष विकी सवाई, अमीर अली अजानी, जाकीर खाँ, सुनील मानकर, राजिक शेख, आसिफ अहमद, अमजद खान, शेख तौसिफ, अज्जू बोरकर, सय्यद काजी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.