बोरधरणाची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:13 PM2018-07-26T22:13:30+5:302018-07-26T22:14:28+5:30
निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विजय माहूरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/घोराड : निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.
पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात येतात. इतकेच नव्हे तर काही हौसी धरणाच्या पाण्याच्या काठापर्यंत जावून डबा पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. शिवाय ते चिमुकल्यांना सोबत घेवून धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे बोरधरण सध्या जलतरण तलाव झाल्याचे दिसते. तेथे दर्शनी भागावर पोलीस विभागाच्यावतीने सुचना फलक लावण्यात आला आहे. परंतु, त्या सुचनांकडे सध्या दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार टाळावा यासाठी बोर प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाºयांनी तसेच सेलू पोलिसांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
पाण्यात उतरुण घेतला जातोय सेल्फी
वर्धा पाटबंधारे विभागाकडून धरणाच्या मुख्य भागावर छायाचित्र काढण्यास मनाई असल्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, तेथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मोबाईलचा फ्लॅश धरणावर पाडून बोरधाचे चित्र मोबाईलमध्ये कैद केले जात आहे. इतकेच नव्हे तर चक्क धरणाच्या पाण्यात उतरुण सेल्फी काढली जात असल्याने धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आहे.
प्लास्टिक बंदीचा फज्जा
कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. असे असले तरी सध्या बोरधरण परिसरात विकल्या जाणाऱ्या वस्तूसाठी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा प्रकार दिसून येतो. तेथे प्लास्टिकच्या पत्रावळीचा वापर होत असून उपयोग झाल्यानंतर त्या नागरिक अस्ताव्यस्त फेकुन देत असल्याने प्लास्टिक बंदीचा येथे फज्जाच उडल्याचे दिसून येते. योग्य कार्यवाहीची गरज आहे.
दारुच्या बाटल्यांचा खच
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी काही मद्यपी या परिसरात चोर वाटेने दारू आणून तेथे दारूपार्टीच करीत असल्याचे दिसून येते. पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांसह दारूच्या रिकाम्या शिश्यांचा खच धरण परिसरात दिसून येतो. या परिसराची नैसर्गिक सुंदरता कायम रहावी तसेच मद्य पार्टीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.
२४ तास सुरक्षा रक्षक देण्याची मागणी
विस्तीर्ण असलेल्या परिसरात धरणाच्या किनाऱ्यावरून पर्यटक फेरफटका मारतात; पण पाण्याच्या काठावर जावून बसणाऱ्यांची संख्या कमी नाही. येथे येणाऱ्या दुसऱ्या पर्यटकांना सुद्धा सुरक्षिततेची आवश्यकता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी बोरधरण परिसरात २४ तास सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.