पंचायत समितीची सुरक्षा वाऱ्यावर
By Admin | Published: June 15, 2017 12:49 AM2017-06-15T00:49:23+5:302017-06-15T00:49:23+5:30
तालुक्यातील ६२ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर आहे.
रात्रपाळीत पहारेकरीच नाही : अनेकदा घडल्या चोरीच्या घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : तालुक्यातील ६२ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. आधीच जीर्ण इमारत, सुरक्षा भिंतीचा अभाव आणि रात्रपाळीत सुरक्षा रक्षकही नसल्याने चोरीची शक्यता वाढली आहे. परिणामी, शासकीय दस्तावेजांची सुरक्षाच धोक्यात आली आहे.
प्रशस्त अशा जागेत ही इमारत असून तीनही बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा भिंत नाही. या परिसरात असणाऱ्या वसाहतीचे साहित्य यापूर्वीच चोरट्यांनी लंपास केल्याचे सर्वश्रूत आहे. अनेक वेळा येथील गोदामातून साहित्याची चोरी झाल्याच्या घटना घडल्या; पण प्रशासनाला जाग आली नाही. रात्रपाळीत येथे चौकीदार नाही. या इमारतीत कार्यालयातील दस्तावेज, संगणक, आवारात दोन चार चाकी वाहने उभी असतात. यात गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन व हातपंप दुरुस्त करणाऱ्या वाहनाचा समावेश आहे. प्रत्येक विभागात लागलेले कुलर बाहेर वऱ्हांड्यात असल्याने त्यांची सुरक्षा कोण करणार, हा प्रश्नच आहे. काही दिवसांपूर्वी इमारतीच्या छतावर टाकलेल्या ताडपत्र्या वादळामुळे उडाल्या. पैकी दोन ताडपत्र्या बेपत्ता झाल्यात तर वऱ्हांड्यात असणारा वॉटर कुलरही रात्रपाळीत रामभरोसे असतो. या कार्यालयातील महागड्या वस्तू व दस्तावेजांची सुरक्षा रात्रपाळीत व सुटीच्या दिवशी वाऱ्यावरच आहे. प्रशासन याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सोमवारी १०.४० वाजेपर्यंत दोन विभाग कुलूपबंद
सोमवारी कार्यालयीन वेळेत अधिकारी पोहोचले असताना १०.४० पर्यंत कृषी व पंचायत विभागाचे कुलूप उघडण्याचे काम ज्यांच्याकडे होते, ते आलेच नाही. अखेर कक्ष अधिकाऱ्यांनी त्या कुलूपाच्या चाव्या दिल्या. ९.३० वाजता कार्यालयाचे कुलूप उघडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. ८ जून रोजी रात्रपाळीत लेखा विभागाचे कार्यालय उघडेच असल्याचे आढळून आले. हे प्रकारही नित्याचे झाले आहेत.
बंद सभागृहातील लाईट, पंखे सुरूच
शुक्रवारी सायंकाळी बंद करण्यात आलेले सभागृह सोमवारी १०.४५ ला उघडले असता पंखे व लाईट सुरू होते. यामुळे विजेची बचत होण्याऐवजी अपव्यय होतो. सभागृह बंद करताना पंखे व लाईट बंद करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकारांकडेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
पंचायत समितीमध्ये तीन परिचर असून नऊ विभाग आहेत. प्रत्येकी तीन विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोमवारी ज्या दोन विभागांचे १०.४० वाजेपर्यंत कुलूप उघडले नाही, त्या विभागाची जबाबदारी असणारे परिचर रजेवर आहेत.
- डी.ए. उईके, कक्ष अधिकारी, पं.स. सेलू,
शनिवार व रविवारी सुट्टी होती. दरम्यान, आलेल्या वादळामुळे ताडपत्र्या उडाल्यात. त्यापैकी दोन ताडपत्र्या गायब झाल्या आहेत. रात्रपाळीत येथे कुणीही चौकीदार नाही. चौकीदाराच्या नेमणुकीची मागणी करण्यात आली आहे.
- आर.व्ही. कोपरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पं.स. सेलू.