बनावट आदेशावर सागाची कटाई

By admin | Published: May 31, 2015 01:42 AM2015-05-31T01:42:48+5:302015-05-31T01:42:48+5:30

बनावट सर्व्हे व कटाई आदेश तयार करून शेतकऱ्याला अंधारात ठेवत त्याच्या शेतातील सागवृक्षाची कटाई केल्याचा प्रकार वनविभागाच्या कारवाईत उघड झाला आहे.

Saga harvesting on fake order | बनावट आदेशावर सागाची कटाई

बनावट आदेशावर सागाची कटाई

Next

शेतकऱ्याची फसवणूक : मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
आकोली : बनावट सर्व्हे व कटाई आदेश तयार करून शेतकऱ्याला अंधारात ठेवत त्याच्या शेतातील सागवृक्षाची कटाई केल्याचा प्रकार वनविभागाच्या कारवाईत उघड झाला आहे. तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्याकरिता असलेला वाहतूक परवानाही बनावट असल्याचे समोर आल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कारवाई करीत सागवान जप्त केले.
या प्रकरणी वनरिक्षेत्र अधिकारी देवराव टाले यांनी शनिवारी सायंकाळी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शेख हाफिज शेख नबी रा. मासोद, धनराज चंपत औजेकर रा. पिंपपळखुटा व विरेंद वेलजीभाई सुरानी रा. लकडगंज, नागपूर या तिघांवर भादंविच्या ४२०, ४६५, ४६८, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जंगलव्याप्त भागात खसरा या गोंडस नावाखाली ठेकेदार व त्यांच्या दलालांनी धुडगुस घातला आहे. सुसुंद शिवारात रामा तानबा नेहारे यांच्या मालकीच्या शेतात जंगलाला लागून धुऱ्याने डेरेदार सागवृक्ष होते. त्यावर दलालांची वक्रदृष्टी पडली. मासोद येथील एका दलालाने रामा नेहारे या शेतकऱ्याच्या शेताचा सातबारा अधिकार अभिलेख पंजी, नकाशा मिळवला व त्या आधारे खोटी मंजुरी मिळवली.
शेत जंगलालगत असल्यामुळे सागवृक्षाच्या कटाईच्या मंजुरीपूर्वी सर्व्हे होणे गरजेचे होते. त्याकरिता खोटे शिक्के तयार करून सर्व्हे केल्याचे दाखवले. वनविभागाकडे कोणताही अर्ज नसताना वनविभागाच्या नावे खोटा आदेश तयार करून सागवृक्षाची कटाई करण्यात आली. शेतातील व सागवृक्षांची कटाई करून न थांबता जंगलातील डेरेदार सागवृक्षही कापले. शेतातील साग कापल्याची कुणकुण शेतकऱ्याला लागताच शेतकऱ्याने शेताकडे धाव घेतली असता सत्यता उघडकीस आली. त्याने लागलीच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठत घटनेची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी टाले यांनी घटनास्थळ गाढून तोडलेले सागवान जप्त केले. शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान कापून ते विकणारे मोठे रॅकेट असल्याची चर्चा गावात आहे. यात चार ते पाच जणांचा सहभाग असल्याची माहिती आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास इतर अनेकही बोगस प्रकरणे बाहेर येवू शकतात. या प्रकरणात पोलीस व वनविभागाचे अधिकारी काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)
परवान्याच्या शासकीय पद्धतीला बगल
सागवृक्ष तोडण्याकरिता प्रथम तहसीलदाराचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवावे लागते. नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात प्रकरण दाखल केल्यानंतर क्षेत्र सहाय्यक पंचनामा करतो. गरज भासल्यास मोजणीचा सर्व्हे होतो. नंतरच कटाई आदेश देण्यात येतो. येथे मात्र सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले. खोटा वाहतूक परवाना तयार करूण सागाची उचल करणार असल्याच्या कुजबुजीने हा प्रकार उजेडात आला.

Web Title: Saga harvesting on fake order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.