हिंगणघाट येथील साहिल मून वर्धा जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 04:40 PM2020-07-15T16:40:53+5:302020-07-15T16:41:26+5:30
सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून हिंगणघाट येथील भारतीय विद्याभवन, गिरिधरदास मोहता विद्यामंदिरच्या साहिल राजू मून याने ९८.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून हिंगणघाट येथील भारतीय विद्याभवन, गिरिधरदास मोहता विद्यामंदिरच्या साहिल राजू मून याने ९८.८ टक्के गुण प्राप्त करुन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच जय महाकाली शिक्षण संस्थाव्दारा संचालित गांधीसिटी पब्लिक स्कूल, पुलगावच्या अनिमेश प्रवीण राऊत याने ९८ टक्के मिळवून दुसरा तर भवन्स लॉयड्स विद्यानिकेतनच्या तेजस किरण वांदिले याने ९७.२० टक्के गुण प्राप्त करुन तिसरा क्रमांक मिळविला.
यावर्षी कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांचेही निकालाकडे लक्ष लागले होते. आता निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये सीबीएसईच्या एकूण १७ शाळा असून अपवाद वगळता सर्वच शाळांचा निकाल शतप्रतिशत लागला आहे. संचारबंदीमुळे पहिल्यांदाच निकालानंतर शाळांमध्ये शुकशुकाट दिसून आला. तसेच विद्यार्थ्यांनीही निकालाचा जल्लोष मित्रमंडळीसोबत साजरा न करता नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.