‘आत्मदाह’च्या रूपात झळकणार सेलूचा ‘आनंद’
By admin | Published: April 19, 2015 01:58 AM2015-04-19T01:58:35+5:302015-04-19T01:58:35+5:30
एखादा छंद, आवड, वेड व्यक्तीला कुठे घेऊन जाईल, हे सांगणे कठीणच! असेच काहीसे घडले सेलूतील एका युवकाशी!
प्रफुल्ल लुंगे ल्ल सेलू (जि़वर्धा)
एखादा छंद, आवड, वेड व्यक्तीला कुठे घेऊन जाईल, हे सांगणे कठीणच! असेच काहीसे घडले सेलूतील एका युवकाशी! तो गावात वृत्तपत्र विकून आपला खर्च भागविणारा तरूण; पण संगीताचे भारी वेड! शिवाय अभिनयाचीही आवड; पण घरची आर्थिक स्थिती जेमतेम़ आर्थिक परिस्थितीने खचून जाणारे प्रगती करू शक नाही, असे म्हणतात ते या तरूणाने खरेच करून दाखविले़ आपले वेड, छंद सोडून त्याने वास्तवाला साद घातली; पण संधी ही प्रत्येकालाच मिळते़ त्यालाही मिळाली़ आत्मदाह या चित्रपटाच्या रूपाने आता सेलूचा हा तरूण राज्यभर झळकणार असून तालुक्याचा लौकिक वाढविणार आहे़
आनंद जगताप असे त्या संगीतवेड्या तरूणाचे नाव आहे़ त्रिशराज मुव्हीज निर्मीत ‘आत्मदाह’ या मराठी चित्रपटासाठी त्याची निवड झाली व तो यात तहसीलदाराची भूमिका बजावतोय़ सुनील जयस्वाल व राजेश वाठोरे निर्देशीत तसेच रंजीत राठोडद्वारा लिखित ‘आत्मदाह’ हा मराठी चित्रपट या वर्षीच्या मे महिन्यात प्रदर्शित होण्याचा अंदाज आहे़
या चित्रपटाची कथा ‘शेतकरी आत्महत्या’ विषयी वलय निर्माण करणारी आहे. जीवावर येणारे संकट बिकट व असह्य झाल्यानंतर शेवटचा टोकाचा निर्णय म्हणून शेतकरी आत्महत्या करतो; पण त्याच्या आत्महत्येनंतर कुटुंबाची होणारी वाताहत हा विषय चित्रपटात हृदयस्पर्शी चित्रित केला आहे़
या चित्रपटात सेलू येथील आनंद खुशाल जगताप याने तहसीलदाराची महत्त्वपूर्ण भूमिका वठविली आहे. आनंद तसा मूळचा संगीतप्रेमी असला तरी आर्थिक परिस्थितीने तो या ध्येयापासून दूरच होता़ वडील यवतमाळ जिल्ह्यातील परसोडी (जगताप) येथील मूळचे रहिवासी़ वडील प्रसिद्ध मोटारपंप, रेडिओ मेकॅनिक़ सेलू जवळील धानोली येथील आजोळ असल्याने हे कुटुंब सेलूला स्थायी झाले़ वडिलांनी सेलू येथे दुकान सुरू केले. कालांतराने वडिलांचे गुण आनंदमध्ये आले़ तो चांगला मोटर मेकॅनिक झाला. त्याने सावंगी (मेघे) येथे स्वत:चे दुकान थाटले; पण त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. आर्णी (यवतमाळ) येथील सुनील राणे यांच्या सहकार्याने तो सदर चित्रपटाचे आॅडीशन देण्यास गेला़ त्याची संवाद शैली, देहयष्टी पाहून त्याला तहसीलदाराची भूमिका देण्यात आली. निर्माता जयस्वाल यांनी स्वत: विरोधी भूमिका केली आहे. राजेश वाठोरे यांनी दिगदर्शन केले असून माळवी यांनी गीतरचना केली आहे. यात आर्ट डायरेक्टर म्हणून ‘दिवाणा’, ‘हत्यारा’ यासह १०९ चित्रपटात यशस्वी काम करणारे लिलाधर सावंत यांनी भूमिका बजावली आहे. या चित्रपटात अभिनेता म्हणून रितेश नगराळे तर अभिनेत्री म्हणून सुप्रिया पाटील यांनी काम केले आहे.
मुख्य विरोधी भूमिकेत अविनाश बनसोड दिसणार आहे़ वैशाली माडे व बेला शेंडे यांनी स्वरसाज चढविला आहे. त्रिशराज मुव्हीज निर्मीत आत्मदाह या मराठी चित्रपटात ग्रामीण भागातील सेलूसारख्या शहरातील आनंद जगतापच्या निवडीने तालुक्याचे नाव सांस्कृतिक व चित्रपट क्षेत्रात दूरपर्यंत पोहोचविले आहे़