संतांनी कधीच चमत्कार केले नाहीत
By admin | Published: February 6, 2017 01:10 AM2017-02-06T01:10:28+5:302017-02-06T01:10:28+5:30
‘ज्ञानदीप लावू जगी’ असे म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील संत परंपरेने कधीच चमत्कार केले नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांनी चमत्काराचे कधी समर्थनही केले नाही;
संजय इंगळे तिगावकर : अंधश्रद्धा निर्मूलन व व्यक्तिमत्त्व कार्यशाळा
हिंगणघाट : ‘ज्ञानदीप लावू जगी’ असे म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील संत परंपरेने कधीच चमत्कार केले नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांनी चमत्काराचे कधी समर्थनही केले नाही; पण आपण त्यांना चमत्कार चिकटवून त्यांचे खरे कार्य दुर्लक्षीत करीत आहोत, असे मत अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सल्लागार समितीचे सदस्य संजय इंगळे तिगावकर यांनी व्यक्त केले.
स्थानिक अ.भा. अंनिस तालुका शाखेद्वारे आयोजित एकदिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत मार्गदर्शक व वक्ता म्हणून संत आणि चमत्कार या विषयाची मांडणी करताना बोलत होते. मंचावर कार्यशाळेचे दुसरे मार्गदर्शक तथा वक्ता म्हणून अ.भा. अंनिसचे जिल्हा संघटक पंकज वंजारे, जिल्हा सचिव निलेश गुल्हाणे, तालुकाध्यक्ष मनोज गायधने, तालुका सचिव शंकर बावणे, जगदीश वांदिले, समुद्रपूर तालुका संघटक प्रफुल कुडे उपस्थित होते.
इंगळे तिगावकर पूढे म्हणाले की, विठ्ठल आपल्या कामात मदत करतो, असा उल्लेख संत साहित्यात येतो. कोणतेही काम गौन नसून श्रमप्रतिष्ठा स्थापित करणे, हा यामागचा संतांचा मूळ उद्देश आपण समजून घेतला पाहिजे. यावेळी त्यांनी संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांना चिकटलेल्या चमत्कारांचे त्यांच्याच साहित्याच्या आधारे खंडन केले. रंजल्या गांजल्या माणसातच देव शोधा, हे सांगणाऱ्या संत गाडगेबाबांनी सत्यनारायण व सर्वच कर्मकांडाबाबत कीर्तन व कृतीतून मांडलेल्या तर्कशुद्ध विचारांची प्रभावी मांडणी त्यांनी केली.
वंजारे यांनी भूत, भानामती, करणी, जादुटोणा या विषयाची मांडणी करताना भूत जगात अस्तित्वात नसूनही आपण भूतावर विश्वास ठेवतो. कारण, लहानपणापासूनच आपल्या मनावर चुकीच्या पद्धतीने चुकीचे संस्कार होत असतात. त्यातूनच आपल्या मेंदुमध्ये भूताविषयी माहिती सेव्ह होते आणि एकदा का भूताविषयी माहिती आपल्या मेंदूमध्ये सेव्ह झाली की, आपल्याला कधीही भूत लागू शकते. म्हणून लहानपणापासूनच मुलांवर वैज्ञानिक पद्धतीने संस्कार करणे गरजेचे आहे, असे सांगितले. शिवाय त्यांनी आध्यात्मिक बुवाबाजी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देऊन बुवा-बाबा यांची निर्मिती कशी होते, याची प्रक्रियाही समजावून सांगितली.
प्रास्ताविक गायधने यांनी केले. संचालन गुल्हाणे यांनी केले तर आभार बावणे यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रपाल मेश्राम, रतनलाल बोरकर, प्रदीप म्हसकर, जितेंद्र रामटेके, सचिन कांबळे, परमेश्वर नरवटे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)