कर्जमाफीच्या अर्जदारांचे होणार चावडी वाचन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 08:48 PM2017-09-28T20:48:44+5:302017-09-28T20:50:29+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जदार शेतक-यांच्या यादीचे वाचन करण्यात येणार आहे.
वर्धा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जदार शेतक-यांच्या यादीचे वाचन करण्यात येणार आहे. २८ जून २०१७ च्या शासन निर्णयातील पात्र- अपात्रतेच्या निकषांप्रमाणे अर्जदार शेतक-यांची प्राथमिक पडताळणी आणि नागरिकांचे आक्षेप यावेळी नोंदविण्यात येणार आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबाजावणीसाठी तालुका व उपविभागीय स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तालुका स्तरीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना तालुक्यातील गावे वाटून देण्यात आली आहेत. अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या अर्जदाराच्या याद्या पोर्टलवरून काढून त्याचे ठराविक दिवशी गावात वाचन करतील. अर्जदाराच्या पात्रतेसंबधीची शहानिशा चावडी वाचन सभेच्या माध्यमातून करण्यात येईल. यातून पुढे आलेल्या माहितीवरून अर्जदाराच्या पात्र- अपात्रतेबद्दलचे शेरे नोंदविण्यात येतील.
पती पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये या कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे एका कुटुंबातुन एकच अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र कुटुंबातून एकापेक्षा जास्त अर्ज केले असल्यास अशा अर्जदाराच्या अर्जात यथावकाश आवश्यक ती दुरुस्ती करून त्यांच्या अर्जाचा पुनर्विचार करण्यात येईल.
या योजनेंतर्गत विहित पद्धतीप्रमाणे प्राप्त अर्जाची आणि बँकांकडून कर्जासंबंधी प्राप्त माहितीची शहानिशा करण्यात येईल. प्राप्त माहितीच्या आधारे अर्जदाराचे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करणे याचा निर्णय तालुकास्तरीय समिती मार्फत घेण्यात येईल. बँकेकडील कर्जासंबंधी माहितीचे व अर्जदाराच्या अर्जाचे ऑनलाईन पद्धतीने मुल्यमापन करून लाभार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात येईल. यात तात्पुरते पात्र अर्जदार, अतिरिक्त माहितीसाठी प्रलंबित अर्जदार , तात्पुरते अपात्र अर्जदारआणि विचाराधीन अर्जदार यादी अशा स्वरूपात चार याद्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येतील. पोर्टलवरील याद्याना विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन तीन दिवसात जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राप्त माहितीशी सांगड घालून पुन्हा चार वर्गीकरणनिहाय याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील. तालुकास्तरीय समितीने पात्र किंवा अपात्र ठरविलेल्या अर्जदारांना त्यांच्या मोबाईलवर sms द्वारे कळविण्यात येईल. तालुकास्तरीय समितीने अपात्र ठरविल्यानंतर उपविभागीय समितीपुढे अर्जदाराला लिखित अर्जाद्वारे किंवा ऑनलाईन दाद मागता येणार आहे.