मृत महिलेस जिवंत दाखवून शेतीची विक्री; पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 04:47 PM2019-12-07T16:47:37+5:302019-12-07T16:47:44+5:30

साखरा येथील बहीण, भाऊ, आई यांच्या संयुक्त नावाने असलेल्या शेतजमिनीची विक्री एका भावाला दारू पाजून तसेच बोगस शेतमालक खरेच शेतमालक असल्याचे दाखवून करण्यात आली.

Sale of farm by showing dead woman alive | मृत महिलेस जिवंत दाखवून शेतीची विक्री; पोलिसात तक्रार

मृत महिलेस जिवंत दाखवून शेतीची विक्री; पोलिसात तक्रार

Next

समुद्रपूर : तालुक्यातील साखरा येथील बहीण, भाऊ, आई यांच्या संयुक्त नावाने असलेल्या शेतजमिनीची विक्री एका भावाला दारू पाजून तसेच बोगस शेतमालक खरेच शेतमालक असल्याचे दाखवून करण्यात आली. इतकेच नव्हे तर हा प्रकार पूर्णत्त्वास नेताना मृत महिलेला जिवंत असल्याचे दाखविण्यात आले. या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

प्राप्त माहितीनुसार, साखरा येथील कुणाल अरुण गोवारकर, महेश अरुण गोवारकर, कल्याणी अरुण गोवारकर तसेच दिवंगत  विद्या अरुण गोवारकर याच्या नावाने मौजा पिपरी शेत सर्वे क्र. १५० / २ आराजी ४.२८ हेक्टर आर ही शेतजमीन आहे. वडिलोपार्जित असलेल्या या शेतजमिनीची बनावट दस्ताऐवजाच्या जोरावर विक्री करण्यात आली. महेश गोवारकर याला दारूचे व्यसन असल्याने शेत दलालांनी त्याचे भाऊ कुणाल, बहीण कल्याणी व मृत आई विद्या यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड तयार केले. शिवाय कुणाल गोवारकर याच्या जागेवर वैभव तामगाडगे, बहीण कल्याणी हिच्या जागेवर पुजा टोहकर तर मृत विद्या गोवारकर यांच्या जागेवर नंदा पाटील यांना हेच ते व्यक्ती म्हणून उभे करण्यात आले. तसेच नागपूर येथील निरावती चंद्रकांत बोंडादे यांना २८ नोव्हेंबर २०१९ला सदर शेतजमिनीची विक्री करून दिली. ज्यांना विक्री करून दिली त्या महिलेकडून ७ लाख २५ हजार रुपये उकळण्यात आले.

आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी महेश गोवारकर हा मद्यधुंद अवस्थेत असताना यांच्या हातात रक्कम ठेवून त्याचे छायाचित्र घेतले. तर पैसे पुन्हा परत घेऊन त्याला केवळ दहा हजार रुपये दिले. उर्वरित पैशाचा आरोपींनी अपहार करीत शेतमालकाची फसवणूकच केली. कुणाल गोवारकर याला या विक्रीबाबतची माहिती मिळताच त्याने समुद्रपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय गाठून चौकशी केली. शिवाय काही कागदपत्र मिळविले. त्या कागदपत्रांमधील बनावट फोटो, बोगस दस्ताऐवज पाहून त्याचीही भंबेरी उडाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने समुद्रपूर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी तक्रारीवरून महेश अरुण गोवारकर, निरावती चंद्रकांत बोंडादे, अर्जनविस डि. एन. पांडे रा. हिंगणघाट, वैभव बाबाराव तामगाडगे, पुजा दिलीप टोहोकर, नंदा रामदास पाटील, भैया बापुराव शेंडे रा. हिंगणा डिगडोह,  चंद्रकांत दशरथ बोंडादे रा. नागपूर,  देवानंद उत्तम तामगाडगे, रवी चव्हाण, गुरुदास पवार व इतर यांच्यावर समुद्रपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. याच दलालांनी आणखी किती लोकांना गंडा घातला याची चौकशी सध्या ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात निलेश पेठकर, चेतन पिसे करीत आहेत.

Web Title: Sale of farm by showing dead woman alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.