मृताच्या नावावर दुसरी व्यक्ती उभी करून केली शेतीची विक्री
By admin | Published: March 5, 2017 12:29 AM2017-03-05T00:29:42+5:302017-03-05T00:29:42+5:30
३० लाख रुपयांत २७ एकराचा व्यवहार : पोलिसात गुन्हा दाखल; शेत नावावर करण्याकरिता साक्षीदार असणारे दोघे अटकेत;
३० लाख रुपयांत २७ एकराचा व्यवहार : पोलिसात गुन्हा दाखल; शेत नावावर करण्याकरिता साक्षीदार असणारे दोघे अटकेत; मुख्य आरोपी अद्याप फरार
पुरुषोत्तम नागपुरे ल्ल आर्वी
मृतक अविनाश भागवत रा. नागपूर यांना जिवंत दाखवून त्यांचे तालुक्यातील शहामहंमदपूर येथील शेतसर्व्हे नंबर ८ मधील २७ एकर शेती ३० लाख रुपयात परस्पर विकल्याचा खळबळजनक प्रकार येथे उघड झाला. मृताच्या नावावर दुसऱ्याच व्यक्तीला खरेदीच्या वेळेला उभे करून हा कारनामा रोशन त्र्यंबक निमकर रा. श्रीराम वॉर्ड यांनी केल्याचे पोलीस तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी आरोपींविरूद्ध कलम ४२०, ४६८,४७१, ३४ गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
छत्रपती शंकर घोडे व सचिन रामदास सोनोने अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या व्यतिरिक्त मुख्य आरोपीसह दोघे अन्य एक फरार असल्याची माहिती आहे. अटकेत असलेल्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
मृतक अविनाश भागवत यांचा मुलगा अनिरूद्ध भागवत रा. सोनजरीनगर नागपूर यांना या प्रकाराची माहिती मिळताच आर्वी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी केलेल्या तपासात मोठे गौडबंगाल असून यात अनेकांचा सहभाग असल्याचे समोर आले. हा व्यवहार झाला त्यावेळी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सचिन रामदास सोनोने रा. बोरगाव (हा.) व छत्रपती शंकर घोडे रा. कन्नमवारनगर, आर्वी या दोघांना साक्षदार म्हणून उभे केल्याचे समोर आले. आर्वी येथील दुय्यम निंबंधकांनी हा व्यवहार केल्याचेही समोर आले आहे. विक्री करून देणाऱ्याने मृतक अविनाश भागवतऐवजी त्यांच्या नावे खोटे आधार कार्ड व पॅनकार्ड विक्रीच्या वेळेस सादर केल्याचेही समोर येत आहे. ही विक्री होताच पटवारी व मंडळ अधिकारी यांनी सदर शेत त्वरीत रोशन निमकरच्या नावे करून दिले. याचा लाभ घेत निमकरने याच शेतीवर २४ आॅगस्ट २०१६ रोजी अॅक्सीस बँककडून १२ लाखांचे कर्जही उचलले.
आर्वी पोलिसांनी खरेदीवेळी साक्षीदार छत्रपती शंकर घोडे व सचिन रामदास सोनोने या दोघांना अटक केली. शेताची खरेदी करून घेणाऱ्या रोशन निमकर व तोतया अविनाश भागवत हे दोघे अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे. तसेच नकली आधार कार्ड, पॅनकार्ड कोणी बनवून दिले, पटवारी व मंडळ अधिकारी यांनी कोणतीही शहानिशा न करता शेताचा फेरफार रोशन निमकरच्या नावाने कसा केला, या सर्व प्रकाराचा तपासही पोलीस करीत आहे. या प्रकरणी पुन्हा कितीजण आरोपी म्हणून अडकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात जमादार विनोद वानखेडे, अशोक रामटेके व अखिलेश गव्हाने करीत आहे.
शेतमालकाचा तीन वर्षांपूर्वीच मृत्यू
वास्तविकतेत शेतीचे मुळ मालक अविनाश भागवत यांचा १५ सप्टेंबर २०१४ ला त्यांच्या नागपूर येथील निवास्थानी मृत्यू झाला. त्यांच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीला उभे करून रोशन निमकर याने हा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.
आधार कार्ड व पॅनकार्डही बनावट
या प्रकरणात भागवत यांच्या नावे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड हे दस्तऐवज तयार करण्यात आले आहे. ते दस्तऐवज नेमके कुठे तयार झाले याचा शोध पोलीसांकडून घेण्यात येत आहे. सध्या तरी त्याचा कुठलाही सुगावा लागला नाही.