रेल्वे रुळावरून खाद्यपदार्थांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:31 PM2018-07-07T22:31:44+5:302018-07-07T22:32:26+5:30
सेवाग्राम येथील बापू कुटीत गांधी विचारांची माहिती जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात; पण तेथील रेल्वे स्थानकावर सध्या रेल्वे विभागाच्या नियमांना फाटा देत खाद्यपदार्थ्यांची विक्री होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम येथील बापू कुटीत गांधी विचारांची माहिती जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येतात; पण तेथील रेल्वे स्थानकावर सध्या रेल्वे विभागाच्या नियमांना फाटा देत खाद्यपदार्थ्यांची विक्री होत आहे. त्याकडे कारवाईची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.
सेवाग्राम रेल्वे स्थानकावरून प्रत्येक दिवशी सुमारे १६० रेल्वे गाड्यांची ये-जा होते. त्यात सुमारे ४० प्रवासी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. बहूतांश रेल्वे गाड्यांचा तेथे थांबा असून रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रेल्वे ओवर ब्रीजच्या पायऱ्या चढु व उतरु शकत नाही अशांंसाठी लिफ्टचीही सुविधा नुकतीच करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना अनेक सोयी-सुविधा देण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा असला तरी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर अस्वच्छतेने कळस गाठल्याचे दिसून येते. जे पाणी रेल्वे प्रवासी पिण्यासाठी वापरतात त्याच पाण्याच्या नळा भोवती सांडपाणी साचून राहत आहे. शिवाय रेल्वे फलाटावर ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या व पाण्याच्या रिकाम्या शिश्या आढळून येतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे या फलाटावरून त्या फलाटावर ये-जा करण्यासाठी रेल्वे ओवर ब्रीजचा वापर न करता थेट रेल्वे रुळावरून ये-जा करतात. बहतांश वेळा खाद्यपदार्थ विक्री करणारे रेल्वे रुळावर उभे राहूनच खाद्यपदार्थ विक्री करीत असल्याने व त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा ठरत आहे. सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरात एकमेव कॅन्टींग असून तेथील कर्मचारी प्रवाशांना अपमानास्पत वागणूक देत असल्याचे बोलले जात आहे. कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या सेवाग्राम रेल्वे स्थानक प्रशासनाला जागे करण्यासाठी रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.
अन्यथा सहा महिन्यांचा कारावास
रेल्वे ओवर ब्रीजचा वापर न करता रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांवर रेल्वे अधिनियम १४७ अन्वये कारवाई केली जाते. सदर कलमान्वये आरोपी हा दोषी आढळल्यास त्याला ५०० रुपये ते १ हजार रुपये दंड अथवा सहा महिने कारावासाच्या शिक्षेला सामोरे जावे लागते. असे असले तरी सेवाग्राम रेल्वे स्थानकावर सदर रेल्वे नियमाकडे पाठ दाखवत खाद्यपदार्थ व थंड पाणी विक्रेता चक्क रेल्वे रुळावरूनच या पदार्थांची विक्री करताना दिसून येतात. त्यामुळे अनुचित घटना टाळण्यासाठी कारवाईची गरज आहे.
जबाबदारी झटकण्यातच गुंग?
रेल्वे ब्रीजचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार रेल्वे सुरक्षा बलाला असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय काही अधिकारी चक्क खाद्य पदार्थ विक्रेत्यांची बाजू घेत असल्याची चर्चा सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरात दबक्या आवाजात होत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर सुजान प्रवाशांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रवाशांचे आरोग्य धोक्यात
सेवाग्राम रेल्वे स्थानक परिसरात ठिकठिकाणी प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच परिसरात सांडपाणी साचत असून अस्वच्छतेने कळस गाठल्याने प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शिवाय ठिकठिकाणी कचरा पडुन राहत असून तो पावसामुळे ओला होत कुजत असल्याने दुर्गंधीचा सामनाही सध्या प्रवाशांना करावा लागत आहे.
रेल्वे स्थानकातील कायदा व सुरूव्यवस्थेची जबाबदारी स्थानिक रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाची आहेच. रेल्वे नियमांना फाटा देणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- ज्योतीकुमार सतीजा, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त, नागपूर.
रेल्वे स्थानक परिसरातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाची आहे. रेल्वे रुळावरून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर ते वेळोवेळी कारवाई करतात. रेल्वे स्थानकातील स्वच्छता व प्रवाशांना कुठलाही खाद्यपदार्थ विक्रेता अपमानास्पद वागणूक देत असल्याची तक्रार आतापर्यंत प्राप्त झालेली नाही.
- पी. टी. मुजूमदार, स्टेशन प्रबंधक, रेल्वे स्टेशन, सेवाग्राम.