मोफतच्या तांदळाची लाभार्थ्यांकडून विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 05:00 AM2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:00:16+5:30
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्या गेल्याने शासनाने ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’ अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून प्रतीव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. जिल्ह्यातील जवळपास १० लाख ७३ हजार १९२ व्यक्तींना जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभ मिळत आहे. गेल्या एप्रिल महिन्यांपासून मोफतचा तांदूळ मिळत असल्याने तो साठविण्यासही अडचणी येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाकडून गरीबाला मिळणारे स्वस्त धान्य, दुकानदारांकडून बाजारात विकल्या जात असल्याची आतापर्यंत ओरड होत आली आहे. पण, या कोरोनाकाळात शासनाकडून मोफत दिलेले तांदूळ थेट दहा रुपये किलोने लाभार्थ्यांकडूनच विकल्या जात असल्याचे चित्र गावोगावी पहावयास मिळत आहे. त्यामुळे पहिले दुकानदारांकडून तर आता खुद्द लाभार्थ्यांकडूनच शासनाच्या योजनेला हरताळ फासल्या जात असल्याने कारवाई कुणावर होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांचे रोजगार हिरावल्या गेल्याने शासनाने ‘पंतप्रधान गरीब कल्याण योजना’ अंमलात आणली. या योजनेच्या माध्यमातून प्रतीव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेत त्याची अंमलबजावणीही सुरु आहे. जिल्ह्यातील जवळपास १० लाख ७३ हजार १९२ व्यक्तींना जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभ मिळत आहे. गेल्या एप्रिल महिन्यांपासून मोफतचा तांदूळ मिळत असल्याने तो साठविण्यासही अडचणी येत आहे. त्यातुळे काही लाभार्थ्यांनी आता या मोफतच्या तांदळाची दहा रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री सुरु केली आहे. तर काहींनी शक्कल लढवून दोन किलो तांदळाच्या बदल्यात एक किलो ज्वारी देण्याचा फंडा शोधून काढला आहे. पवनार येथे चक्क ग्रामपंचायत सदस्याकडूनच मोफत तांदळाची विक्री होत असल्याचा फोटो व्हायरल झाला. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी धान्याच्या बदल्यात धान्य मिळत असेल तर त्यात गैर काय? असे सांगितले. असाच काहीसा प्रकार वर्ध्यालगतच्या सिंदी (मेघे) परिसरातील हिंदनगर शितला माता मंदिर जोशी ले-आऊटमध्ये रविवारी सुरु होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास एम. एच. ३२ जी. १६५२ क्रमांकच्या वाहनामागे ५० ते ६० लोकांची रांग लागली होती. ते तांदूळ देऊन वाहनचालकांकडून ज्वारी घेत होते.
यावेळी सोशल डिस्टंस्निंगचा फज्जा उडाल्याचे लक्षात येताच नगरपालिका आणि महसूल विभागाच्या पथकाने हा प्रकार थांबवून वाहन ताब्यात घेत रामनगर पोलीस ठाण्यात लावले. तसेच वाहन मालक इस्त्राईल शेख मुन्सी व अमीत बजरंगदास सौदिया दोघेही रा. पुलगाव यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. नगरपालिकेचे पथक प्रमुख निखिल लोहवे, ज्ञानेश्वर परटक्के, गजनान पेटकर तर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी देशमुख यांनी ही कारवाई केली असून यासंदर्भात पोलिसांना लेखी तक्रारही दिली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध संचारबंदीच्या उल्लंघनाचे कारण पुढे करून गुन्हा नोंदविला आहे.
फिल्टर करून तांदूळ दामदुप्पट दराने येतोय बाजारात?
ऐरवी ग्रामीण भागात तांदूळासह धान्य विक्री करण्यासाठी वाहनाने येणारे लहान व्यापारी आता तांदूळाची खरेदी करायला येतांना दिसून येत आहे. गावागावमध्ये फिरुन दहा रुपये किलो दराने स्वस्त धान्य दुकानातून मिळालेले तांदूळ ते खरेदी करीत आहे. ग्राहकांनाही ते तांदूळ मोफत मिळाल्याने तेही दहा रुपये दराने त्यांना विकत आहे. दहा रुपये दराने खरेदी केलेले तांदूळ फिल्टर करुन २५ ते ३० रुपये दराने बाजारपेठेत विक्रीस येत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे फिल्टरचे काम हे जिल्ह्यातच काही मोठे व्यावसायीक करीत असल्याने धान्यातील या नव्या काळ्याबाजाराच्या मुळाशी जाण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
दुकानदारही म्हणतो काहीही करा पण, तांदुळ न्या!
शासनाच्या आदेशानुसार लाभार्थ्यांना दरमहिन्याला धान्य पुरवठा करण्याची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारांवर आहे.त्यांच्यावर प्रशासनाचाही वॉच असल्याने आणि बायोमॅट्रीक्स प्रणाली अनिवार्य केल्याने स्वस्त धान्य दुकानदारही आता लाभार्थ्यांना तांदळासह इतर धान्य घेऊन जाण्यास सांगत आहे. काहींकडून तांदूळ नेण्यास नकार दिला जात असला तरीही काहीही करा पण, तुमच्या वाट्याचे तांदूळ घेऊन जा, असा आग्रह धरत असल्याने लाभार्थीही ईच्छा नसताना मोफतचे तांदूळ आणून ते दहा रुपये दराने विकत आहे. त्यामुळे शासकीय धान्याचा होणारा हा गैरवापर तात्काळ थांबविण्याची गरज आहे.