घातक कीटकनाशकांची विक्री बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:21 AM2017-10-12T01:21:25+5:302017-10-12T01:21:41+5:30
शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात १९ शेतकºयांचा मृत्यू झाला. शिवाय वर्धा जिल्ह्यातही शेतकºयांना विषबाधा झाल्याच्या घटना आहेत.
विजय माहुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू/घोराड : शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात १९ शेतकºयांचा मृत्यू झाला. शिवाय वर्धा जिल्ह्यातही शेतकºयांना विषबाधा झाल्याच्या घटना आहेत. यामुळे कृषी विभागाने कृषी केंद्रांच्या तपासणीची मोहीमच हाती घेतली आहे. यात घातक ठरू शकणाºया किटकनाशकांवर विक्री बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत.
कृषी विभागाकडून कृषी केंद्रांची पाहणी करण्यात येत आहे. यासाठी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पथके कृषी केंद्रांची पाहणी करीत आहेत. यात विक्रीचे आदेश नसलेले तथा कंपनीचे शिफारस पत्र नसलेले कीटकनाशक आढळल्यास त्यांची विक्री करू नये, असे आदेश केंद्र संचालकांना दिले जात आहेत. कपाशीवर फवारणी करण्यासाठी बाजारात काही जहाल कीटकनाशक उपलब्ध आहेत; पण कंपनीकडून त्यांना शिफारस पत्र दिले जात नाही. असे असले तरी त्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे. यामुळेच औषध फवारणी करताना पोटात गेल्याने वा अंगावर उडाल्याने बाधा होत असल्याचे प्रकार उघड झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात हा प्रकार होऊ नये म्हणून कृषी विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.
कीटकनाशकामुळे फवारणी करणाºया व्यक्तीचे आरोग्य धोक्यात येत आहे. डोळ्यांना त्रास होणे, अंगाची आग होणे आदी घटना घडत आहेत. यामुळे शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे. यासाठी कृषी वार्ताफलक तथा ग्रा.पं. व कृषी केंद्रांमध्ये पत्रके लावण्यात आली आहेत. शेतकºयांनी शेतात फवारणी करणाºया व्यक्तीला रेनकोट, डोळ्याच्या संरक्षणासाठी गॉगल तर काही ठिकाणी हेल्मेट वापरण्यास सुरूवात झाल्याचेही दिसून आले आहे. ज्या कीटकनाशकाची ज्या पिकासाठी शिफारस केली आहे, तेच कीटकनाशक खरेदी करून त्याच पिकावर फवारणी करावी. अधिक प्रमाणात किटकनाशकाचा वापर करू नये, असे आवाहन केले जात आहे. शेतकºयांना फवारणीबाबत मार्गदर्शन कृशी सहायकाकडून मार्गदर्शन केले जात आहे. कृषीवार्ता फलकावर याबाबत सूचना देण्यात येणार असून त्याप्रमाणे शेतकºयांनी फवारणी करण्याचे सुचविले जात आहे.
सेलू तालुक्यातील कृषी केंद्रांची केली पाहणी
सेलू तालुक्यात तालुका कृषी अधिकारी बाबूराव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पथकामार्फत कृषी केंद्रांची पाहणी करण्यात आलेली आहे. यात विक्रीचे आदेश नसलेल्या कीटकनाशकांची विक्री कृषी केंद्र चालकांनी करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. पथकाने सेलू तालुक्यातील बहुतांश कृषी केंद्रांना भेटी दिल्या असून पाहणी करण्यात आलेली आहे. यात बहुतांश कृषी केंद्रांना विक्रीबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
कृषी वार्ता फलकाच्या माध्यमातून शेतकºयांना याबाबत सूचनाही देण्यात येत आहेत. शिवाय ग्रामपंचायत तथा कृषी केंद्रांमध्ये कागदी पत्रके लावून फवारणी तथा कीटकनाशकाच्या वापराबाबत शेतकºयांमध्ये सजगता निर्माण करण्याचे प्रयत्नही कृषी विभागाकडून केले जात आहेत.
कृषी केंद्रांच्या तपासणीकरिता जिल्ह्यात पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाºयांमार्फत पाहणी केली जात आहे. ज्या-ज्या कीटकनाशकांना कंपनीचे शिफारस पत्र नाही, त्या कीटकनाशकांना विक्री बंदीचे आदेश देण्यात येत आहेत. यासाठी कीटकनाशकांमध्ये ठराविक कंटेंट किती प्रमाणात आहेत, हे तपासण्यात येत आहे.
- ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.