कपाशीच्या ३७० वाणांनाच विक्री परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:14 PM2018-05-21T22:14:33+5:302018-05-21T22:15:24+5:30
गत हंगामात कपाशीच्या बीटी बियाण्यांवर बोंडअळीने हल्ला केल्याने यंदाच्या खरीप हंगामात बीटी बियाण्यांच्या विक्रीवर मर्यादा लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कपाशीच्या बियाण्यांवर शासनाचे धोरण ठरले असून राज्यात केवळ ४२ कंपनीच्या ३७० वाणांनाच विक्री परवाना देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गत हंगामात कपाशीच्या बीटी बियाण्यांवर बोंडअळीने हल्ला केल्याने यंदाच्या खरीप हंगामात बीटी बियाण्यांच्या विक्रीवर मर्यादा लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कपाशीच्या बियाण्यांवर शासनाचे धोरण ठरले असून राज्यात केवळ ४२ कंपनीच्या ३७० वाणांनाच विक्री परवाना देण्यात आला आहे. यात जेईएसीने मंजूर केलेल्या नावानेच बियाणे विक्री करण्यात येणार आहे. या नावाव्यतिरिक्त कोणत्या कंपनीने दुसऱ्या कोणत्या ब्रँडनेमने बियाणे विकल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
गत हंगामात कापूस बियाणे विकणाºया कंपन्यांनी वाटेल त्या नावाने बियाणे विक्री करण्याचा सपाटा सुरू केला आहे. याचा परिणाम उत्पादकतेवर झाला. बीटी बियाण्यांवर बोंडअळी हल्ला करीत नसल्याचे सांगणाºया कंपन्यांच्या वाणावरच अळ्यांनी हल्ला केला. यामुळे प्रकरणे पोलिसांत पोहोचली. या प्रकारातून अनेक शेतकºयांना सर्व सोयी असताना मोठ्या उत्पादनापासून वंचित राहावे लागले. राज्यात २००६ पासून बीटी बियाण्यांचा वापर होत असून पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने सरकारही विचारात पडले होते. कापूस लागवडीच्या क्षेत्रात एकूण ९८ टक्के क्षेत्रावर बीटी बियाण्यांची लागवड होत असल्याचे दिसून आले आहे.
गत हंगामात राज्यात अस्तीत्वात असलेल्या कापूस बियाणे विक्री करणाºया कंपन्यांकडून ४०२ वाणांची तब्बल ६२४ नावांनी विक्री झाली होती. यात केवळ नफेखोरीमुळे कंपन्यांकडून एकच वाण वेगवेगळ्या नावांनी विकल्या गेल्याचे समोर आले आहे. यामुळे या प्रकारावर आळा घालण्याची मागणी होवू लागली. पर्यायाने शासनाने यावर प्रतिबंध लावण्यावा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ जेईएसीने दिलेल्या नावानेच बियाणे विक्री करण्याची मुभा आहे. बाजारात विक्री करण्याकरिता असलेल्या बियाण्यांचा कालावधी केवळ १८० दिवसांचा राहणार आहे. या दिवसांपेक्षा अधिक काळ झालेले बियाणे बाजारात राहिल्यास त्या कंपनीवर कार्यवाही होणार आहे. शासनाने निर्देशीत केलेल्या प्रमाणातीलच बियाणे घेण्याचे आवाहन आहे.
सव्वादोन लाख हेक्टरकरिता हवी १०.१८ लाख पाकिटे
कापूस उत्पादकांचा भाग म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात यंदाच्या खरीपात २ लाख २५ हजार ३६३ हेक्टरवर कपाशीचा पेरा होणार असल्याची माहिती आहे. याकरिता जिल्ह्याला तब्बल ४ हजार ५८४ क्विंटल म्हणजेच १० लाख १८ हजार बियाण्यांच्या पाकिटांची गरज आहे.
जिल्ह्यात ९५० कृषी केंद्र
शेतकऱ्यांना बियाणे विक्रीकरिता जिल्ह्यात तब्बल ९५० वितरक आहेत. त्यांच्या दुकानात शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बियाणे दाखल होत आहे. ते लवकरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
सायोबीनचीही बियाणे दाखल
जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर सोयाबीनचे बियाणे देखील उपलब्ध झाले आहे. हे बियाणे खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांकडून दुकानांत गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या खरीपात जिल्ह्यात एकूण १ लाख १७ हजार हेक्टरवर सोयाबीनच्या पेऱ्याचे नियोजन आहे.