‘यू-ट्यूब’वर घेतले चोरीचे धडे अन् ‘ओएलएक्स’वर विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:06 AM2018-10-06T00:06:17+5:302018-10-06T00:06:59+5:30
मोबाईल चोरीबाबत यू-ट्यूबर व्हिडीओ बघत शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानातून मोबाईल लंपास करण्यात आले. तसेच आरोपींनी चोरीच्या या मोबाईलची ओएलएक्सवरून विक्रीही केल्याचे पोलिसांच्या कारवाईत पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मोबाईल चोरीबाबत यू-ट्यूबर व्हिडीओ बघत शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानातून मोबाईल लंपास करण्यात आले. तसेच आरोपींनी चोरीच्या या मोबाईलची ओएलएक्सवरून विक्रीही केल्याचे पोलिसांच्या कारवाईत पुढे आले आहे. प्रगत तंत्रानाचा वापर करीत नियोजनबद्ध चोरी करून महागड्या मोबाईलची विक्री करणाऱ्या या तिन सदस्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे या तीन चोरट्यांपैकी दोघे अल्पवयीन असून एक आरोपी १९ वर्षाचा आहे. शिवाय तिघेही आरोपी उच्च शिक्षित कुटुंबातील आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तिन युवकांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. चोरट्यांनी दिलेली माहिती ऐकून पोलीस अधिकारी व कर्मचारी थक्क झालेत. त्यांच्याकडून पोलिसांनी नियोजनबद्धपणे शहरातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानातून चोरी केलेले दोन महागडे मोबाईल जप्त केले आहे. हे मोबाईल या चोरट्यांनी ओएलएक्सवर विकले होते. सदर प्रकरणातील आरोपी असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा आर्वी नाका भागातील मानस मंदिर परिसरातील रहिवासी असून त्याचे वडील आष्टी येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. १६ वर्ष वय असलेल्या आरोपी नालवाडी भागातील देशपांडे ले-आऊट येथील रहिवासी आहे. त्याचे वडील बांधकाम अभियंता असून तिसरा आरोपी असलेल्या आदेश रत्नाकर ढेंगरे (१९) रा. सिंदी (मेघे) याची आई रा.प.म. मध्ये कार्यतर आहे. हे तिनही उच्च शिक्षित कुटुंबातील असले तरी त्यांनी चोरी करण्याचे आणि चोरीच्या साहित्याची विल्हेवाट लावण्याचे धडे ज्या पद्धतीने घेत काम फत्ते केले यामुळे पोलिसांच्याही भुवया उंचावल्या. सदर चोरट्यांकडून पोलिसांनी ३० हजारांचे दोन महागडे माबाईल, दोन दुचाकी असा एकूण १ लाख ५० हजारांचो मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. तेली, अप्पर पोलीस अधीक्षक पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात प्रमोद जांभुळकर, हितेंद्र परतेकी, यशवंत गोल्हर, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, संघसेन कांबळे, विकास अवचट, रितेश शर्मा, येल्ले आदींनी केली.
मोबाईल खरेदीच्या निमित्ताने दुकानात प्रवेश
मोबाईल खरेदी करायचा असल्याचा देखावा करीत या टोळीतील दोन सदस्य मोबाईलच्या दुकानात प्रवेश मिळवित होते. दुकानात प्रवेश मिळविल्यानंतर सदर दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत असाच ते देखावा करीत. दरम्यान एक जण मोबाईल बघता-बघता तो मोबाईल आपल्या ताब्यात घेत दुकानाबाहेर दुचाकी घेवून उभा असलेल्या टोळीतील तिसऱ्या सदस्यासोबत घटना स्थळावरून पळ काढत. याच दरम्यान दुकानात प्रवेश मिळविला आणि टोळीतच एक सदस्य असलेला तरुण दुकानदाराला काय झाले साहेब अशी विचारणा करीत त्याला व्यस्त करून आपल्या साधीदाराला पळण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
शिकवणीचे पैसे खर्च झाल्यावर नवी युक्ती
सदर टोळीतील चोरट्यांपैकी एकाच्या कुटुंबियांनी त्याला शिकवणीसाठी पैसे दिले होते. मात्र, ते पैसे नियोजित कामासाठी न वापरता या तिघांनी दुसऱ्याच गोष्टीसाठी खर्च केले. पुन्हा पैसे कुठून आणाचे हाच विचार डोक्यात ठेवून या तिघांनी यू-ट्यूबवर चोरी कशी करावी याचा व्हिडीओ बघून त्याचा अवलंब केला. शिवाय रामनगर भागातील दोन दुकानातून मोबाईलची चोरी केली. इतक्यावरच हे चोरटे थांबले नाही तर त्यांनी चोरीचे मोबाईल ओएलएक्सवर टाकून त्याची विक्री केली. ते मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहे.
या प्रकरणातील तिनही आरोपींना आम्ही ताब्यात घेतले आहे. त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. तिनही आरोपी उच्च शिक्षित कुटुंबातील आहेत. त्यांनी चोरीचे धडे यू-ट्यूबवर व्हिडीओ बघून घेतले. शिवाय त्यांनी चोरीच्या मोबाईची ओएलएक्सवरून विक्री केली. ते मोबाईल व इतर साहित्य आम्ही जप्त केले आहे. आरोपींमध्ये दोघे अल्वपयीन असून आपला मुलगा कुठल्या वाईट संगतीत तर नाही ना या बाबतची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे.
- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. वर्धा.