सेलू शहराला होतोय क्षारयुक्त पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 05:00 AM2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:07+5:30
सेलू ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर होताच नवी पाणी पुरवठा योजना सेलू शहरासाठी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. बोरधरणाच्या पात्राशेजारी भव्य अशी विहीर खोदुन तेथील पाणी पाईपलाईनद्वारे सेलू शहरातील खोडके ले-आउटपर्यंत आणण्याचे प्रयोजन होते. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे शरीराची हाडे ठिसूळ होणे, अन्न पचन प्रक्रियेत बिघाड, लघवीचा आजार याचे अरुग्ण शहरात झपाट्याने वाढत आहे. शरीरास अत्यंत धोकादायक असलेले दूषित पाणी शहरवासी कित्येक वर्षापासून पीत आहेत.
बोरधरणवरून सेलूसाठी पाणी पुरवठा करणारी योजना नगर पंचायतीची स्थापना होताच मंजूर झाली. मग घोडे अडले कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतात क्षारांचे प्रमाण मोठे असून ते आरोग्यास घातक असल्याचे वैद्यकीय सूत्र सांगते. येथील पाण्यात ६५० ते ७०० टीडीएस आहे. ज्यांची आर्थिक ऐपत आहे, त्यांनी घरी आर.ओ. मशीन लावून त्यातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जातो, तर काही जण पाण्याच्या कॅन विकत घेऊन पिण्यासाठी वापरतात. मात्र, ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना नळातून थेट येते तेच पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. यामुळे सर्वसामान्यांचे व लहान मुलांचे आरोग्य धोकादायक वळणावर आहे. या गंभीर बाबीकडे शासनाचे, पाठपुरावा करणाºया नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
सेलू ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर होताच नवी पाणी पुरवठा योजना सेलू शहरासाठी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. बोरधरणाच्या पात्राशेजारी भव्य अशी विहीर खोदुन तेथील पाणी पाईपलाईनद्वारे सेलू शहरातील खोडके ले-आउटपर्यंत आणण्याचे प्रयोजन होते. त्या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचे प्रस्तावित होते. शासनाकडून बोरधरण ते सेलू अशी पाईपलाईन टाकण्याकरिता मोजमापही अभियंत्यांकडून करण्यात आले. चांगली योजना कार्यान्वित होण्याची वाट पाहून सेलूकर थकले; मात्र या योजनेला मूर्त रूप देण्यात आले नाही. ही योजना बारगळली की विचाराधीन आहे, याबाबत नगर पंचायतीकडे माहितीच नाही. ग्रामपंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्यावर कोटीने निधी प्राप्त झाला. रस्ते, नाल्या यांचे बांधकाम सुरू आहे. शासनस्तरावरून आमदार डॉ. पंकज भोयर यांनी प्रयत्न करून सेलूला विविध योजनामधून पुरेसा निधी दिला. नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र बोरधरणच्या पाणीपुरवठा योजनेबाबत पाठपुरावा केला नाही. सेलू शहराला जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणीपुरवठा करण्याची आरोग्यासाठी नितांत गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी आहे.
लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुरावा नाही
दहा वर्षांपूर्वी शासनाने बृहत आराखडा तयार करून ११ गावांची बोरधरणवरून पाणी पुरवठा योजना तयार केली होती. त्यात बोरी, हिंगणी, किन्ही, मोही, घोराड, सेलू, धानोली आदी गावांचा समावेश होता. कालांतराने ती योजना पुढे सरकली नाही. त्यानंतर नवीन नगर पंचायत निर्माण होताच बोरधरणवरून थेट सेलूत पाणी आणून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याची योजना आली. अभियंत्यांकडून सर्व्हे झाला. मात्र, पुढे काय झाले याविषयी नगर पंचायतीला माहिती नाही. एकाही नगरसेवकाने याचा पाठपुरावाही केला नाही, हे सेलूकरांचे दुदैव आहे.
पिण्याच्या पाण्यात टीडीएस शंभरपर्यंत असणे व ते पाणी पिणे वैद्यकीयदृष्ट्या सोईचे मानले जाते. मात्र, सेलूत ६५० ते ७०० टीडीएस असलेले पाणी प्यायले जाते. यामुळे शरीराची हाडे कमजोर झाली आहेत. अन्नपचन प्रक्रिया बिघडत असून लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.