वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग पूर्ण; आता वाहतुकीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 08:50 PM2021-11-23T20:50:02+5:302021-11-23T20:50:35+5:30
हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे.
वर्धा : हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून, सर्व कामावर २ हजार ७६२ कोटींचा खर्च झाला आहे. महामार्ग पूर्ण झाला असून, केवळ वाहतुकीची प्रतीक्षा आहे.
समृद्धी महामार्गामुळे नागरिक मुंबई व नागपूर या महानगरांना जोडले जाणार आहेत. वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर असून, सहापदरी हा मार्ग आहे. ५ मोठ्या आणि २७ लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्याकरिता ९ उड्डाणपूल व ३४ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. त्यामध्ये वाहनांसाठी २२, तर पादचाऱ्यांकरिता १२ भुयारी मार्गांचा समावेश आहे. दोन रेल्वे उड्डाणपूलही उभारण्यात आले आहेत. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहेत. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत.
दोन ठिकाणी उभारणार नवनगरे
समृद्धी महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील जमिनी संपादित करण्यात आल्या. त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा आल्याने त्यांच्या जीवनमानातही बदल झाला आहे. यासोबतच इतरही शेतजमिनीचे भाव वाढले असून, गावेही महामार्गाशी जोडली गेली आहेत. या महामार्गालगत दोन ठिकाणी नवनगरे उभारण्यात येणार असून, त्याकरिता केळझर आणि विरुळ ही गावे निश्चित झाली आहेत. यासोबतच गणेशपूर व रेणकापूर येथे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता सुविधा केंद्र राहणार आहे.