तीन टप्प्यात धामची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 11:13 PM2018-02-02T23:13:04+5:302018-02-02T23:13:45+5:30
वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छता करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असलेल्या धाम नदीचे पात्र झाडे, पाणगवत, विविध प्रकारच्या जलपर्णींमुळे धोक्यात आले आहे. यामुळे तिचे पात्र अरुंद झाले आहे. या पात्राची स्वच्छता करण्याकरिता व जलस्त्रोताचे बळकटीकरण करण्याकरिता या नदीची तीन टप्प्यात स्वच्छता करण्यात येत आहे. हा उपक्रम नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत आहे. ही मोहीम उद्या शनिवारपासून सुरू होणार असून त्याला ‘धाम नदी स्वच्छता अभियान’ असे नाव देण्यात आले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नाम फाऊंडेशनचे विदर्भ-खानदेश प्रमुख हरिश इथापे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करुणा जुईकर, महिला व बालकल्याण सभापती सोनाली कलोडे, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री गफाट, जि.प.सदस्य राजश्री राठी यांची उपस्थिती होती.
शिवाय याच नदीतून वर्धा शहराला आणि आसपासच्या गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. या नदीपात्रात असलेल्या जलपर्णीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, शिवाय नदीचे पात्र अरुंद झाले आहे. या सर्व प्रकारामुळे नदीपात्रात पाणी राहत नसल्याचे समोर आले आहे. ही नदी जिल्हयातील काचनूर ते आंजी(मोठी) त.वर्धा ते येळाकेळी,त.सेलु या भागातून धाम नदी वाहते.
या नदीमधुन वर्धा व परिसरातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. नदीपात्रात असलेल्या अस्वच्छतेमुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अत्यंत कमकुवत झाले आहेत. येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत आताच दिसत आहे. ही भीषण समस्या, या भागातील लोकांची व लोकप्रतिनिधींची मागणी पाहता जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नाम फाऊंडेशनच्यावतीने या नदीच्या स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे. ही स्वच्छता मोहीम उद्यापासून प्रारंभ होणार आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मेश्राम, कार्यकारी अभियंता नरेश शेनवार, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग काळे, आंजी (मोठी) येथील सरपंच जगदीश संचारिया, सामाजिक कार्यकर्ते अशोक कलोडे, सुनील गफाट प्रामुख्याने उपस्थित होते.
नाम फाऊंडेशन आणि लोकसहभागातून मोहीम
धाम नदीपात्राच्या स्वच्छतेची मोहीम शासनाच्या सहकार्याने लोकसहभागातून नाम फाऊंडेशन राबविणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा पहिला आर्वी तालुक्यातील काचनुर, वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी) येथे दुसरा टप्पा तर तिसरा टप्पा सेलू तालुक्यातील येळाकेळी येथे राबविण्यात आला.