सहा घाटातील वाळूउपशाची मुदत संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:28 PM2019-07-26T23:28:58+5:302019-07-26T23:29:15+5:30
यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यावर्षी सुरुवातीला आठ घाटांचा लिलाव होऊन ६ कोटी ७४ लाख ४१ हजार रुपयाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला. या आठ वाळूघाटांपैकी सहा वाळू घाटांना जुलैपर्यंत वाळूउपशाची परवानगी देण्यात आली होती. आता या सर्व घाटांची मुदत संपली आहे. पण, लिलावानंतर जवळपास ३७ दिवस न्यायालयाच्या आदेशाने वाळू उपसा बंद ठेवण्यात आल्याने त्याचा फटका घाटधारकांना बसला. यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठविला असून मुदत वाढवून मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.
पहिल्या टप्प्यात आष्टी तालुक्यातील इस्माईपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव (रिठ), नांदगाव (बोरगाव)-२, पारडी (नगाजी), धोची तर समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगांव अशा आठ वाळूघाटांचा लिलाव झाला होता. यापैकी इस्माईलपूरचा घाट वगळता सर्वांनीच एप्रिल महिन्यापासून ताबा घेऊन उपसा सुरु केला. त्यामुळे त्यांना जूलैपर्यंतच मुदत देण्यात आली होती. आता या घाटातून वाळू उपस्याची मुदत संपली आहे. इस्माईलपूर घाटधारकाला स्थगितीनंतर मे महिन्यापासून ताबा दिल्याने या घाटाला १२ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. लिलावानंतरच्या तीन महिन्याच्या कालावधीत जवळपास ३७ दिवस वाळूउपशावर स्थगिती दिली होती. त्यामुळे यात घाटधारकांचे नुकसान झाल्याची ओरड होत असल्याने हे दिवस वाढवून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अद्यापही याबाबत कोणताही विचार झाला नाही. सप्टेंबरनंतर वाळूघाट बंद होत असल्याने काही ठिकाणी मुदत संपल्यावरही अवैध वाळूउपसा सुरूच आहे.
दुसऱ्या टप्प्यात आठपैकी दोन घाटांचाच झाला लिलाव
दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत आठ घाटांचा लिलाव ठेवण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात शिल्लक राहिलेल्या नवाबपूर व बिड लाकडी घाटासह देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे)-१, सोनेगाव (बाई), टाकळी (चनाजी), हिंगणघाट तालुक्यातील घाटसावली, कुरण रिठ व भगवा-२ या घाटांचा समावेश होता. यापैकी हिवरा (कावरे) हा घाट ४२ लाख २३ हजार ५०० रुपयाच्या बोलीत प्रिन्स एंटरप्रायजेसने घेतला आहे. भगवा-२ हा घाट राज ट्रेडर्सने ९ लाख १० हजार ७५० रुपयात घेतला असून त्यांनी अद्याप पैसे भरले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सध्या हिवरा (कावरे)-१ या एकाच घाटाचा मार्ग मोकळा झाला आहे. या घाटातून ३० सप्टेंबरपर्यंतच उपसा करता येणार आहे.
धोची घाट बंद करण्याचा प्रस्ताव
हिंगणघाट तालुक्यातील धोची हा घाट आरपीपी इंन्फ्र ा प्रोजेक्ट कंपनीने तब्बल २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयाच्या ऐतिहासिक बोलीत घेतला होता. या घाटातून वाळू उपसाकरण्याकरिता ३० सप्टेंंबरपर्यंत मुदत होती. मात्र वाळू उपसा करण्याचा कंत्राट घेणाऱ्याने गावकऱ्यावर चाकूहल्ला केल्यामुळे या घाटावर कारवाई करुन घाटाची परवानगी रद्द करण्याचा प्रस्ताव तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. येत्या दोन ते तीन दिवसात ही परवानगी रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवणी-१ मुदतीपूर्वीच बंद
समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१ वाळू घाट ५९ लाख १६ हजार ७०० रुपयात घेतला होता. या घाटातून अवैध उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच कारवाईकरिता गेलेल्या उपविभागीय अधिकाºयांच्या पथकावर नवरंगे नामक वाळू माफियाने पिस्तुल रोखली होती. त्यामुळे हा घाट बंद करण्यात आला. या एकाच्या चुकीमुळे अनेक भागधारकांना चांगलाच फटका बसला आहे.
आष्टी तालुक्यातील ईस्माईलपूर आणि देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे)-१ या दोनच वाळू घाटातून सप्टेंबरपर्यंत वाळू उपसा करता येणार आहे. बाकी घाटांची मुदत संपली आहे. स्थगितीच्या कालावधीत ३७ दिवस घाट बंद असल्याने त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
डॉ.इम्रान शेख,
जिल्हा खनिकर्म अधिकारी वर्धा