वाळू माफियांचा मोर्चा तांभा घाटाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 05:00 AM2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:00:02+5:30
उन्हाळाभर वाळू चोरट्यांनी हिवरा (कावरे) घाटातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु केला. तो आजही बेधडकपणे सुरुच आहे. पण, यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर लोकमतने वृत्त प्रकाशित केले. आता कारवाईच्या धाकाने येथील वाळू चोरट्यांनी आपला मोर्चा तांभा (येंडे ) येथील घाटाकडे वळविला आहे. या घाटांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात १५ ते २० फुट खोल खड्डे पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : जिल्ह्यात एकही वाळू घाटाचा लिलाव झाला नसला तरीही देवळी तालुक्यातील वर्धा नदीपात्रात वाळू माफीयांनी सुरुवातीपासूनच धुडगुस घातला आहे. हिवरा (कावरे) आणि तांभा ( येंडे ) येथील वाळू घाटातून दिवसरात्र वाळू उपसा सुरु असल्याने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. वारंवार तक्रार केल्यानंतरही तहसील कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याने या वाळू माफियांच्या अवैध उपस्याला तहसील कार्यालयाची मूक संमती असल्याचा आरोप गावकरी करीत आहे.
उन्हाळाभर वाळू चोरट्यांनी हिवरा (कावरे) घाटातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु केला. तो आजही बेधडकपणे सुरुच आहे. पण, यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर लोकमतने वृत्त प्रकाशित केले. आता कारवाईच्या धाकाने येथील वाळू चोरट्यांनी आपला मोर्चा तांभा (येंडे ) येथील घाटाकडे वळविला आहे. या घाटांमधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने नदीपात्रात १५ ते २० फुट खोल खड्डे पडले आहे. गावातील महिला या नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जातात. तसेच शेतकरी जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर नेतात. त्यामुळे हे खड्डे जीवघेणे ठरू पाहत आहे. गावकऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा असताना गावातील सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामविकास अधिकारी कोणतीही भूमिका घेत नसल्याचा आरोप गावकरी करीत आहे.दिवसरात्र या घाटातून बाहेर पडणारी वाहने धावत असतानाही तहसील कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लक्ष्मीदर्शनाने वाळू माफियांवर प्रशासनाचा वचक नसल्याने त्यांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडवून ग्रामविकासाला बाधा निर्माण करणाºया वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.
परिसरात कोट्यवधीचे वाळू साठे
लिलावापूर्वीच वाळू चोरट्यांनी अवैध उपसा करुन वाळू घाट रिकामे केले आहे. आता पावसाळ्यात वाळू उपस्याला ब्रेक लागणार असल्याने आताच वाळू नदीबाहेर काढून त्याचा साठा करण्यावर जोर आहे. हिवरा (कावरे), तांभा (येंडे) व विजयगोपाल या परिसरात मागील १५ दिवसात किमान २५ हजार ब्रास रेतीचा साठा करण्यात आला आहे. साठेबाजीला प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नसताना हे साठे गावातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांना दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.वाळू चोरीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने यात अनेकांचे हात ओले केले जात आहे. यातुनच वाळू चोरट्यांना प्रशासनाचीही साथ मिळत आहे. एका ठिकाणी वाळू जमा करुन रात्रीच्या सुमारास टिप्परव्दारे देवळी, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी लॉकडाऊन काळातही वाहतूक होत आहे.
गावकऱ्यांसह शेतकऱ्यांना आमिष
नदीपात्रातून वाळू उत्खनन केल्यानंतर रस्त्यालगतच्या शेतात किंवा या परिसरातील कॅनल लगतच्या भागात साठा केल्या जात आहे. शेतकºयांच्या शेतात किंवा नागरिकांच्या घरासमोर साठा करण्यासाठी त्यांना वाळू चोरटे पैशाचे किंवा वाळूचे आमिष देतात.
बºयाच प्रमाणात ते पूर्णही करत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. तांभा, हिवरा, विजयगोपाल या गावाच्या सीमेवरती तसेच गावालगतच्या काही शेतामध्ये वाळूचे मोठे साठे असून याची संपूर्ण माहिती तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांना आहे. पण, कारवाई होत नाही, हे दुदैवच म्हणावे लागेल.