वाळू उपसा; ८ तस्करांना बेड्या, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

By रवींद्र चांदेकर | Published: May 22, 2024 09:06 PM2024-05-22T21:06:01+5:302024-05-22T21:06:19+5:30

- पारडी, उमरा घाटावर पोहचले एसपी : जेसीबी अन् पोकलॅन्डद्वारा सुरू होता वाळू उपसा

Sand pumping; 8 smugglers shackled, goods worth 2.5 crore seized | वाळू उपसा; ८ तस्करांना बेड्या, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

वाळू उपसा; ८ तस्करांना बेड्या, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील पारडी आणि उमरा येथील वाळू घाटावर पोलिसांनी छापा मारला असता, बोर नदीपात्रातून जेसीबी अन् पोकलॅन्डच्या साहाय्याने वाळूचा वारेमाप उपसा करताना वाळू तस्करांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई २१ रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास पोलिस अधीक्षक नुरुल हसन, सहायक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी १२ तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आठ तस्करांना अटक केली तसेच दोन कोटी ६० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्यांत सतीश वाघमारे (रा. सेलू), अरविंद गांडगे, सूरज दाते (रा. हिंगणी), चंद्रकांत साखरे (रा. येराखेडी), संदीप रामदास मडावी (रा. धनोली मेघे), संजय ससाने (रा. पारडी), महेश बेहरे (रा. दहेगाव), निकेस गहुकर यांचा समावेश आहे तर भूषण वाघमारे (रा. सेलू), सूरज होले (रा. वर्धा), नामदेव गोडामे (रा. सालई पेवट), निखिल रोकडे (रा. सिंदी), निखिल गोडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समुद्रपूर तालुक्यात असलेल्या पारडी आणि उमरा वाळू घाटातील बोर नदीपात्रावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यावरून पोलिसांनी २१ रोजी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरसीपी पथकासह छापा मारला असता जेसीबी आणि पोकलॅन्डच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैधरित्या उपसा करून टिप्परमधून वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी छापा मारत आठ वाळू तस्करांना बेड्या ठोकल्या तर १२ तस्करांविरुद्ध समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित, आर्थिक गुन्हे शाखेचे कांचन पांडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर, रामदास दराडे, भूषण हाडके यांच्यासह पोलिस मुख्यालयातील एक पथक आणि आरसीपी पथकाने केली.

.................
दोन जेसीबी, कार अन् पोकलॅन्डसह टिप्पर जप्त

वाळू घाटावर छापा मारून पोलिसांनी एमएच. ३२ एजे. ५५८८ क्रमांकाचा दहा चाकी टिप्पर, एमएच. ३२ एजे. ३३८८ क्रमांकाचा टिप्पर, एमएच. ३२ एजे. ७१६२ क्रमांकाचा टिप्पर, एमएच. ३२ एजे. १००६, एमएच. ३१ सीबी. ६०३० क्रमांकाचा जेसीबी, विना क्रमांकाचा पोकलॅन्ड, एमएच. ४० बीई. ६८६६ क्रमांकाचा जेसीबी आणि एक एमएच. ३२ एएस. ७७६६ क्रमांकाची चारचाकी असा एकूण २ कोटी ६० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
..................

आठ दिवसांपासून ठेवली बारीक नजर
समुद्रपूर तालुक्यातील पारडीसह उमरा वाळू घाटातून वाळूचा वारेमाप उपसा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक हसन यांना मिळाली होती. त्यांनी विविध पथकांना वाळू घाटावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच तस्करांनी आपली तस्करी बंद केली होती. मात्र, पोलिस अधीक्षकांनी सहायक पोलिस अधीक्षक चव्हाण यांच्या पथकालाही कारवाईबाबत सतर्क केले होते. त्यामुळे पुलगाव विभागाकडून नजर ठेवली जात होती. अखेर तस्करांनी डोके वर काढताच मध्यरात्री थेट छापा मारून त्यांचा डाव हाणून पाडला.

Web Title: Sand pumping; 8 smugglers shackled, goods worth 2.5 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा