रेती तस्करीचा पर्दाफाश, सव्वाकोटींचा माल जप्त
By रवींद्र चांदेकर | Published: May 3, 2024 03:32 PM2024-05-03T15:32:56+5:302024-05-03T15:35:02+5:30
Wardha : पोलिसांची कारवाई; वणा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा
वडनेर (वर्धा) : हिंगणघाट पोलिसांनी तालुक्यातील कवडघाट परिसरात नाकेबंदी करून टिप्पर, ट्रकची तपासणी केली. यात टिप्पर, ट्रकमध्ये अवैध रेती आढळल्याने रेतीसह एक कोटी ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली.
पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यावरून हिंगणघाटच्या ठाणेदार तथा परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी सापळा रचला. गुन्हे प्रगटीकरण पथकाने कवडघाट येथे हिंगणघाट ते वर्धा रोडवर नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान तीन टिप्पर व एक एलपी १६ चाकांचा ट्रक थांबवून त्यांची तपासणी केली. टिप्पर आणि ट्रकमध्ये रेती आढळल्याने चालकांना रेती कोठून आणली, अशी विचारणा केली. रेतीच्या राॅयल्टीबाबतही विचारपूस केली. चालकांनी दारोडा शेतशिवारातील वणा नदीपात्रातून रेती आणल्याचे सांगितले. मात्र, रॉयल्टी नसल्याचे कबूल केले. त्यामुळे पोलिसांनी तिन्ही टिप्पर व एक ट्रक ताब्यात घेतला. चालक व क्लीनर यांनाही ताब्यात घेण्यात आले.
तीन टिप्पर व ट्रकमध्ये अंदाजे ४३ ब्रास रेती होती. प्रतिब्रास सहा हजार रुपयांप्रमाणे पोलिसांनी दोन लाख ५८ हजारांची रेती आणि तीन टिप्पर, एक ट्रक जप्त केला. रेतीसह टिप्पर (क्रमांक एमएच- २७, बीएक्स- ६६९१), (एमएच- ३७, डीजी- ५७७०), (एमएच- २७/७, बीएक्स- ६४९४) आणि ट्रक (क्रमांक एमएच- २७, बीडी- ७९८२), एक मोबाइल असा एकूण एक कोटी ३३ लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सय्यद आसीफ अली सय्यद साहेबअली (३५), सलीम वहीद खा पठाण (२५, दोन्ही रा. कठोरा- गांधी, ता.जि. अमरावती), प्रफुल्ल उत्तमराव केने (३८, रा. प्रवीणनगर, अमरावती), कुणाल मोहनराव घुले (२८, रा. राहाटगाव, ता.जि. अमरावती), वृत्तिक रमेश साबळे (२१, रा. अनकवाडी, ता. तिवसा, जि. अमरावती), आदेश मुंडे (रा. रघुनाथपूर, ता. तिवसा, जि. अमरावती) यांना ताब्यात घेण्यात आले.
जप्त केलेले टिप्पर, ट्रक मिलिंद जवंजाळ (रा. नांदगाव पेठ, जि. अमरावती), सचिन निस्ताने (रा. राहाटगाव, जि. अमरावती) आणि आकाश डेहणकर (रा. मोझरी, जि. अमरावती) यांच्या मालकीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याच सांगण्यावरून आम्ही रेतीची वाहतूक करीत हातो, असेही चालकांनी सांगितले. त्यावरून चालकांसह त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरूल हसन, अपर अधीक्षक डाॅ. सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार तथा परिविक्षाधीन पोलिस अधिकारी वृष्टी जैन, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे, हवालदार प्रवीण देशमुख, सुनील मळणकर, सुनील मेंढे, नरेंद्र आरेकर, विजय हारनूर, जफर शेख यांनी केली.
ताब्यातील पाचपैकी एकाला सोडले
पोलिसांनी रेती तस्करीप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे रॉयल्टीची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांच्यापैकी एकाकडेच रॉयल्टी आढळल्याने त्याला पोलिसांनी सोडून दिले. उर्वरित चारजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता पोलिस टिप्पर व ट्रकमालकाच्या शोधात आहेत. पोलिस उपनिरीक्षक भारत वर्मा पुढील तपास करीत आहेत. लवकरच मालकांचा शोध घेऊन त्यांनाही ताब्यात घेतले जाणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले. मात्र, रेती तस्करीला पाठबळ कुणाचे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. राजकीय पाठबळ असल्याशिवाय रेती तस्करी शक्य नसल्याची परिसरात चर्चा आहे.