सॅनिटाईझ केलेल्या तहसील कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळे लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:36 PM2020-10-09T12:36:35+5:302020-10-09T12:38:27+5:30
Wardha News Fire तहसील कार्यालयाला सॅनिटायझर केल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये काहीही नुकसान झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तीन दिवसापूर्वी आष्टी (शहीद) तहसील कार्यालयात एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव निघाला होता. त्यामुळे तीन दिवस तहसील कार्यालयाचे काम बंद होते. आज तहसील कार्यालय उघडताच तहसीलदार आशिष वानखडे यांनी काही कर्मचारी व तलाठी यांची मिटिंग आयोजित केली होती. अचानक यावेळी इलेक्ट्रिक ची बटन दाबताच शॉर्टसर्किट झाले आणि आग लागली. आगीचे लोळ पूर्ण कार्यालयात पसरल्यामुळे सर्व वातावरण भयभीत झाले होते. लागलीस तहसीलदार, सर्व कर्मचारी, तलाठी कार्यालयाच्या बाहेर आले. त्यांनी तहसील कार्यालयात उपलब्ध असलेल्या आग प्रतिबंधक गॅस च्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. आणि सुटकेचा निश्वास टाकला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.
आष्टी तहसील कार्यालयाचे कामकाज सुरळीतपणे चालू असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र कोरोनामुळे तीन दिवस कामाला बाधा आल्याने आज अचानक गर्दी उसळली. त्यातच आज सकाळी नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयाचे सॅनीटायझर करून देण्यात आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व कार्यालय स्वच्छ करण्यात आले. मात्र इलेक्ट्रिकच्या बोर्डाजवळ सॅनिटायझरचे औषध जास्त प्रमाणात लागल्यामुळे शॉर्टसर्किट झाले. आगीचे लोळ उठतात एकच गोंधळ उडाला. तहसीलदार आशिष वानखडे, नायब तहसीलदार रणजित देशमुख, कांबळे, मंडळ अधिकारी ओमप्रकाश बाळसकर सर्व तलाठी कर्मचारी तात्काळ कार्यालयाच्या बाहेर आले.
तहसील कार्यालयामध्ये एकूण पाच अग्निशामक गॅसचे यंत्र उपलब्ध होते. या पाचही यंत्राच्या साह्याने तहसीलदाराच्या केबिनला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीची घटना आष्टीत वा?्यासारखी पसरली. नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली. ठाणेदार जितेंद्र चांदे, मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी प्रशासनाच्या वतीने मदत करण्यासाठी पावले उचलली. मात्र तहसीलदार वानखडे यांनी समय सूचकता बाळगून कार्यालयातील कर्मचारी यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणल्यामुळे शासकीय रेकॉर्ड सुरक्षित राहिला व जीवित हानी टळली. त्यामुळे तहसील कार्यालयात आग लागली. असा प्रकार सॅनिटायझर मुळे कुठेही होऊ शकतो, म्हणून सावधानता बाळगण्याचे आवाहन तहसीलदार आशिष वानखडे यांनी सर्व कार्यालयांना सुद्धा केले आहे.
तहसील कार्यालयाला सॅनिटायझर केल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये काहीही नुकसान झाले नाही. शासकीय रेकॉर्ड परिपूर्ण सुरक्षित आहे. आम्ही सर्व तात्काळ कार्यालयाबाहेर निघाल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने अग्निशमक गॅस ची व्यवस्था करून ठेवल्यामुळे आज मोठी दुर्घटना टळली.
आशिष वानखडे,
तहसीलदार, आष्टी (शहीद).