आयुष्यमान भारत योजना नागरिकांसाठी संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 09:50 PM2019-01-10T21:50:25+5:302019-01-10T21:51:05+5:30
भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व सामान्यांप्रति जागरुक आहे. सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित केलेली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व सामान्यांप्रति जागरुक आहे. सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याकरिता केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित केलेली आहे.
या योजनेअंतर्गत गरीब कुंटुबातील प्रत्येकाचे आरोग्य कवच तयार असून त्याद्वारे गंभीर आजारावर गरीब कुटुंबातील व्यक्तींना ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेणे सोईचे झाले आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये जिल्ह्यातील १ लाख २९ हजारांपेक्षा जास्त कुंटुबाना आरोग्य कवच मिळालेले आहे. या योजनेतून आतापंर्यत १ हजारपेक्षा जास्त नागरिकांना फायदा झालेला आहे. प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना ही शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांकरिता संजीवनी ठरणार असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. मुरदगाव बेलसरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
देवळी तालुक्यातील मुरदगाव बेलसरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन खासदार तडस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश बकाणे, आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री सुनील गफाट, जि. प. सदस्य वैशाली जयंत येरावार, पं. स. सभापती विद्या दशरथ भुजाडे, पं. स. उपसभापती किशोर गव्हाळकर, पं. स. सदस्य कुसुम प्रभाकर चौधरी, भाजप तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी, जयंत येरावार, माजी सभापती मिलिंद भेंडे, मुरदगावचे सरपंच चंद्रकांत ठाकरे, दशरथ भुजाडे उपस्थित होते.
खासदार तडस म्हणाले, मुरदगाव बेलसरे सारख्या लहान गावात देवळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्र स्थानांतरित झाल्याने या परिसरातील १८ गावे व जवळपास ३४ हजार नागरिकांना आरोग्याची सेवा उपलब्ध होणार आहे. या नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता पुढील आर्थिक वर्षात सुसज्ज इमारत निर्माण करण्याकरिता ३ कोटी रुपये निधी मिळवून देण्यास प्रयत्न करणार तसेच परिसरातील नागरिकांनी मुरदगाव बेलसरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनसुद्धा यावेळी केले. यावेळी राजेश बकाणे, सभापती जयश्री सुनील गफाट, जि.प.सदस्य वैशाली जयंत येरावार, प.स.सभापती विद्या दशरथ भुजाडे यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच चंद्रकांत ठाकरे केले, संचालन हिवंज यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रवीण धवणे यांनी मानले, कार्यक्रमाकरिता मुरलीधर डहाके, संजय वानखेडे, रामदास टाळण, प्रमोद बोबडे, विजय बोतारे, पदमाकर मोकारकर, हनुमंत डहाके, प्रकाश ठाकरे, हितेश भोयर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.