संत लहानुजी महाराज संस्थानने बायोगॅस प्रकल्पातून केली वीजनिर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:01+5:30
सामाजिक विकास साधण्यासाठी आर्वी तालुक्यातील टाकरखेडचे संत लहानुजी महाराज देवस्थान विविध उपक्रम राबवित आहे. या देवस्थानच्या शेतीमध्ये बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यासोबतच गौरक्षण, शेतकरी मार्गदर्शन आणि आरोग्यसेवेवर कार्यरत असल्याने हे देवस्थान अनेकांसाठी मॉडेल ठरले आहे.
पुरुषोत्तम नागपुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी (वर्धा) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील विचारावर आधारित मानवाचा आध्यात्मिक व सामाजिक विकास साधण्यासाठी आर्वी तालुक्यातील टाकरखेडचे संत लहानुजी महाराज देवस्थान विविध उपक्रम राबवित आहे. या देवस्थानच्या शेतीमध्ये बायोगॅस प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्यासोबतच गौरक्षण, शेतकरी मार्गदर्शन आणि आरोग्यसेवेवर कार्यरत असल्याने हे देवस्थान अनेकांसाठी मॉडेल ठरले आहे.
संत लहानुजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे व त्यांच्या संचालक मंडळाने राष्ट्रसंतांच्या विचारावरच प्रगतीचा ध्यास घेतला आहे. या देवस्थानामध्ये सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, नियमित अन्नदान, निराश्रितांना आश्रय, गौरक्षण, आरोग्यसेवा, शेतकरी मार्गदर्शन शिबिर, पर्यावरण संरक्षण तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्प आदी उपक्रम राबविले जात आहे. या संस्थानच्या गौरक्षण केंद्रामध्ये सध्या ३५० गाईंचे संगोपन केले जात असून अजून १०० गाईंची व्यवस्था आहे. संस्थानच्या मालकीची ४० एकर शेती असून सेंद्रिय पद्धतीने केली जाते. गांडूळ खतनिर्मिती करून परिसरातील शेतकऱ्यांना नाममात्र दरात पुरविले जाते. याच खताचा वापर संस्थेच्याही शेतात होत असल्याने परिसरात सेंद्रिय शेतीची चळवळ उभी राहिली आहे. महाऊर्जाच्या सहकार्याने शेतात बायोगॅस प्रकल्प तयार करण्यात आला. त्यामुळे गॅससह विजेचीही सुविधा झाली आहे. परिणामी, वृक्षतोडीला आळा बसला असून याच प्रकल्पाच्या इंधनावर सध्या संस्थामध्ये चालत असलेल्या अन्नदानाचा स्वयंपाक केला जातो. यावर्षी संस्थेच्यावतीने ३ एकरामध्ये ज्वारीची लागवड केली होती. त्यातून जवळपास ४७ क्विंटलचे उत्पादन झाले. दरवर्षी विविध प्रकल्प आणि शेतीतून संस्थानला उत्पन्न मिळते. त्यांच्या या उपक्रमाला तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह स्वामिनाथन व महासंगणकाचे जनक संशोधक विजय भटकर यांनीही भेट दिली आहे.
वृद्धांसाठी आश्रय योजना
जे निराधार आहे, त्यांना कुणाचाही आधार नाही. अशा वृद्धांसाठी संस्थानने ‘आश्रय’ ही योजना राबविली आहे. त्यांची राहण्याची, जेवण्याची व औषधीची सर्व व्यवस्था संस्थानने केली आहे. सध्या या संस्थेत ३५ निराधार व्यक्ती आश्रयाला आहेत. या संस्थेला इंडियन असोसिएशन आर्वीच्यावतीने विनामूल्य आरोग्य सेवा पुरविली जाते. यासोबतच नियमित आरोग्य तपासणी शिबिर राबवून आरोग्य निदान व उपचार केले जाते. गेल्यावर्षी ५ हजार ८५ रुग्णांना सेवा देण्यात आली. याकरिता आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी, कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन चेन्नई व महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय सावंगी (मेघे) आदींचे सहकार्य मिळत आहे.
अन्नदानाची योजना ठरली अभिनव
संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे यांचे वडील भगवंत पावडे हे पूर्वी अध्यक्ष होते. त्यांनी या देवस्थानात येणाºया भाविकांसाठी दररोज अन्नदान योजना सुरू केली होती. तीच योजना आता ३२ वर्षांनंतरही बाळासाहेबांनी चालू ठेवली असून अभिनव योजना ठरली आहे. याकरिता १ हजार ८०० भाविकांनी ३ कोटी ३३ लाखांचा निधी दिली आहे. हा निधी संस्थानने विविध बँकांमध्ये जमा ठेवला असून त्यातून मिळणाºया व्याजातूनच दररोज अडीचशे ते तीनशे लोकांना अन्नदान केले जाते. याव्यतिरिक्त दरवर्षी महाराजांची जयंती व पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते. तेव्हा जवळपास ८० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
राष्ट्रसंतांच्या प्रेरणेतून मानवाचा आध्यात्मिक व सामाजिक विकास साधण्यावर देवस्थानचा भर आहे. देवस्थानासोबतच परिसरातील शेतकरी व नागरिकांचा विकास महत्त्वाचा असल्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. जुने उपक्रम कायम ठेवून त्याला नव्याची जोड दिली जात आहे. भाविकांसह गावकऱ्यांकडूनही मोठे सहकार्य मिळत असल्याने महाराजांच्या आशीर्वादाने कार्यात यशही प्राप्त होत आहे.
- बाळासाहेब पावडे, अध्यक्ष, संत लहानुजी महाराज संंस्थान, टाकरखेड.