वर्धा जिल्ह्यात संतधार सुरूच; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती बिकट, रस्ते बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 08:32 AM2023-07-27T08:32:25+5:302023-07-27T08:33:53+5:30
देवळी तालुकातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे
वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील कुंभी येथे १० ते १५ घरात नाल्याचे पाणी शिरले आहे. लोकांना प्रशासनाच्यावतीने सुरक्षितपणे शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. देवळी तालुक्यातील सरुल येथे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी असल्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग बंद आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी केंद्रांना आज सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे.
देवळी तालुकातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच आंजी ते अंदोरी मार्गावरील पुलावरून देखील पाणी वाहत आहे तसेच गंगापूर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यापैकी गंगापूर गावाचा संपर्क तुटला आहे व इतर गावांना पर्यायी मार्ग आहे. समुद्रपूर तालुक्यातील वासी जवळील पुलावरून पाणी असल्याने नंदोरी वासी रस्ता सद्या बंद आहे. हिंगणघाट शहरातील महाकाली नगरीमध्ये काही ठिकाणी पाणी घुसले आहे. देवळी तालुक्यातील बोरगाव ते अलोडा मार्ग बंद झाला असून हिंगणघाट तालुक्यातील चानकी ते भगवा रोडही पावसाच्या पाण्यामुळे बंद झाला आहे.