सराफांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By admin | Published: March 15, 2016 03:53 AM2016-03-15T03:53:04+5:302016-03-15T03:53:04+5:30
गत १४ दिवसांपासून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर सराफा व्यावसायिकांनी अबकारी कराच्या विरोधात बंद पुकारला आहे.
वर्धा : गत १४ दिवसांपासून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर सराफा व्यावसायिकांनी अबकारी कराच्या विरोधात बंद पुकारला आहे. या बंद दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात विदर्भातील पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यानंतर येथीन एका कार्यालयात व्यावसायिकांची सभा झाली.
अर्थसंकल्पात सराफा व्यावसायिकांवर अतिरिक्त अबकारी शुल्क आकारण्यात आले. या शुल्काविरोधात त्यांच्याकडून अनेकवेळा निवेदने सादर करण्यात आली; मात्र तो कर तसाच ठेवण्यात आला. यामुळे सुवर्णकारांनी १ मार्चपासून बंद पुकारला आहे. यात शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सुवर्णकारांकडून विविध आंदोलने करण्यात आली; मात्र त्याचा काहीच उपयोग होत सराफा व्यावसायिक संताप व्यक्त करीत आहे. याच आंदोलनादरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा न्यायालयाच्या मुख्यद्वाराजवळ अडविण्यात आला. या मोर्चात विदर्भासह जिल्ह्यातील सुवर्णकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा परत येवून त्याचे रुपांतर एका सभेत झाले. येथे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी सदस्यांना मार्गदर्शन करून मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.