सरपंच व सचिवांचा वाद पोहोचला पोलिसांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:10 PM2018-01-02T23:10:08+5:302018-01-02T23:10:26+5:30
हुसेनपूर येथील ग्रा.पं. इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम १ जानेवारी रोजी होता. या कार्यक्रमात सरपंच व सचिव यांच्यातच शाब्दीक चकमक झाली. यामुळे हा वाद पोलिसांत पोहोचला. या प्रकरणाची सध्या परिसरात खमंग चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आ.) : हुसेनपूर येथील ग्रा.पं. इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम १ जानेवारी रोजी होता. या कार्यक्रमात सरपंच व सचिव यांच्यातच शाब्दीक चकमक झाली. यामुळे हा वाद पोलिसांत पोहोचला. या प्रकरणाची सध्या परिसरात खमंग चर्चा आहे.
जिल्हा नियोजन विकास निधीतून दहा लाख खर्च करून बांधण्यात आलेल्या ग्रा.पं. च्या नवीन इमारतीचे लोकार्पण १ जानेवारी रोजी माजी आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते करण्याचे ठरले होते. त्यानुसार ठराव घेऊन सर्वांना माहिती दिली गेली; पण कार्यक्रमात ग्रामसेवक विलंबाने पोहोचले. यामुळे माजी आमदारांचा पारा भडकला. त्यांनी ग्रामसेवकाला धारेवर धरले. यातच सरपंच व ग्रामसेवकातही शाब्दीक चकमक ऊडाली. प्रकरणाला गालबोट लागू नये म्हणून माजी आमदारांनी पुलगाव पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे माहिती दिली. यात ग्रामसेवक मद्यप्राशन करून असल्याचे सांगून पोलीस बोलविले. पोलिसांनी लगेच ग्रामसेवक निमजे यांना वैद्यकीय तपासणीसाठी सोबत नेले. सरपंच कुरसंगे यांनी ग्रामसेवक निमजेविरूद्ध पुलगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केली. पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नसला तरी घटनेची चर्चा मात्र रंगत आहे.
२६ डिसेंबर रोजी ग्रा.पं. च्या आढावा बैठकीत १ जानेवारी रोजी प्रमुख अतिथींच्या हस्ते लोकार्पण करण्याचे ठरले होते. असे असताना ग्रामसेवकाने कोणतीही व्यवस्था केली नाही. उलट मद्यप्राशन करून कार्यक्रमात विलंबाने आले व वाद घातला. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.
- रवी कुरसंगे, सरपंच, ग्रा.पं. हुसेनपूर.
कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेल्याने मला विलंब झाला. यात सरपंच व माजी आमदाराने आकसाने खोट्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न केला. अहवाल आल्यानंतर सर्व समोर येईल, याची खात्री आहे.
- नानेश्वर निमजे, ग्रामसेवक, ग्रा.पं. हुसेनपूर.
संबधित ग्रामसेवकाची वैद्यकीय तपासणी केली आहे. अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
- विठ्ठल दुधकोहळे, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. पुलगाव.