ठराव न घेता सरपंचाने भंगार साहित्याची केली विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:30 PM2019-09-24T22:30:49+5:302019-09-24T22:31:17+5:30
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कुठल्याही वस्तूची विक्री करताना ग्रामसभेत ठराव घेणे गरजेचे आहे. मात्र, सरपंच विशाल वसंत भांगे यांनी तसे न करता भंगार साहित्य विक्रीस काढले. साहित्य नेण्याकरिता गाडीही बोलावली. मी सरपंच असून काहीही करू शकतो, ग्रामपंचायतीचा मालक आहे, असे उत्तर देत ग्रामपंचायतीची खोली स्वच्छ करायची असल्याने भंगार बाहेर काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कुठलाही ठराव न घेता परस्पर भंगार साहित्य विक्रीस नेताना नागरिकाने सरपंचाला रंगेहात पकडले. याविषयी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली. सेलू तालुक्यातील बोरी (कोकाटे) येथे ही खळबळजनक घटना घडली.
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या कुठल्याही वस्तूची विक्री करताना ग्रामसभेत ठराव घेणे गरजेचे आहे. मात्र, सरपंच विशाल वसंत भांगे यांनी तसे न करता भंगार साहित्य विक्रीस काढले. साहित्य नेण्याकरिता गाडीही बोलावली. याच दरम्यान गाविंदा वामनराव पेटकर तेथे आले. त्यांनी सरपंचाकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. मी सरपंच असून काहीही करू शकतो, ग्रामपंचायतीचा मालक आहे, असे उत्तर देत ग्रामपंचायतीची खोली स्वच्छ करायची असल्याने भंगार बाहेर काढले, असे सांगितले.
खोली स्वच्छ करायची होती, तर मग साहित्य नेण्याकरिता मालवाहू गाडी कशी बोलावली, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. ठराव न घेता पदाचा दुरुपयोग करू भंगार साहित्य विक्रीस नेणाऱ्या सरपंचावर कारवाई करावी, अशी मागणी पेटकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.