तळेगाव ग्रा.पं.च्या बचावासाठी सरपंच संघटना सरसावली
By Admin | Published: September 5, 2015 02:03 AM2015-09-05T02:03:29+5:302015-09-05T02:03:29+5:30
तालुक्यातील भाजप प्रणित तळेगाव ग्रामपंचायत सध्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आहे. गावातीलच काही भाजप व काँग्रेसच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन : अतुल तिमांडे यांची माहिती
वर्धा : तालुक्यातील भाजप प्रणित तळेगाव ग्रामपंचायत सध्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आहे. गावातीलच काही भाजप व काँग्रेसच्या लोकांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन आहे. हे आरोप चुकीचे असल्याचा प्रत्यारोप वर्धा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व तळेगावचे सरपंच अतुल तिमांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
गजानन पोहाणे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केलेल्या शौचालय बांधकामाचे १० हजार ९०० रुपये ही रक्कम त्यांना एकाचवेळी देण्यात आली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या नावाने दोनदा रक्कम उचलल्याचा आरोप होता. उपसरंपंच सारदा मोहिजे या संयुक्त कुटुंबात राहतात. त्यांच्या मालकीच्या घराला लागून शौचालय बांधकाम केलेले आहे. यामुळे शौचालय नसल्याचा आरोप तथ्यहीन आहे, असेही तिमांडे म्हणाले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दीपक तिमांडे, प्रिया तिमांडे, प्रमोद वंजारी यांनी बिहार पॅटर्न अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षसंगोपनावर प्रत्यक्ष काम केले. हजेरीपंजीमध्ये जातीचा प्रवर्ग निहाय मंजुरीची नोंद केली जात नाही, असे सांगत इतरही आरोपांचे खंडन केले. याप्रसंगी सभापती मिलिंद भेंडे, यांच्यासह परिसरातील सरपंच व सदस्य उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)