सरपंच पत्नी व सदस्य पती पायउतार
By admin | Published: April 26, 2017 12:21 AM2017-04-26T00:21:39+5:302017-04-26T00:21:39+5:30
शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया श्याम मोहळ आणि सदस्य श्याम मोहोड या ...
सिंदी(मेघे) ग्रामपंचायतीतील प्रकार : अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
वर्धा : शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया श्याम मोहळ आणि सदस्य श्याम मोहोड या पती-पत्नीने त्यांच्या घरातील एक खोली अंगणवाडीकरिता भाड्याने देत भाडे वसुल करून पदाचा दुरूपयोग केल्याची तक्रार गावातील अरुण देविदास येसणकर यांनी केली होती. त्या तक्रारीची चौकशी केली असता मोहोड दाम्पत्यावर असलेले आरोप सिद्ध झाल्याने त्यांना पदावरून पायउतार करण्याचा निर्णय अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
प्राप्त माहितीनुसार, सिंदी ग्रामपंचायतीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य म्हणून सुप्रिया मोहोड तर त्यांचे पती श्याम मोहोड निवडूण आले. येथे असलेल्या आरक्षणानुसार सुप्रिया मोहोड सरपंच झाल्या. त्या पदावर असताना त्यांनी त्यांच्या घरी असलेली एक खोली २६ क्रमांकाच्या अंगणवाडीकरिता १००० रुपये महिन्याने अंगणवाडी क्रमांक २६ करीता भाड्याने देत आपल्या पदाचा दुरूपयोग केला. या संदर्भात अरुण येसणकर यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली.
प्रशासनाकडे आलेल्या या तक्रारीची चौकशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी इवनाथे यांनी केली असता केलेले आरोप सत्य असल्याचे निदर्शनास आले. यावरून सरपंचाने केलेले कृत्य हे त्याच्या पदाचा दुरूपयोग करण्यास कारण ठरत असल्याने त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १६ नुसार कार्यवाही केली. यात सरपंच सुप्रिया मोहोड आणि सदस्य श्याम मोहोड यांना पदावरून पायउतार केले. हा निर्णय १८ एप्रिल रोजी देण्यात आला. या तारखेपासून सिंदी (मेघे) येथील सरपंचपद व एक सदस्यपद रिक्त असल्याचे समोर आले आहे.(प्रतिनिधी)