सर्वोदयी कार्यकर्त्या करुणा फुटाणे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 11:27 AM2023-08-04T11:27:16+5:302023-08-04T11:28:18+5:30
खादीक्षेत्रातील एक समर्पित कार्यकर्ती काळाच्या पडद्याआड
वर्धा : गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे (६६) यांचे गुरुवारी (दि. ३) सकाळी सहा वाजता गोपुरी येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. आचार्य विनोबा भावे यांचे अनुयायी, प्रसिद्ध परंधाम प्रकाशनचे प्रकाशक दिवंगत रणजितभाई देसाई यांच्या त्या कन्या होत्या. त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ कृषितज्ज्ञ व सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव फुटाणे, मुले विनय व चिन्मय, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव पवनार येथील परंधाम आश्रमात नेण्यात आले. त्यानंतर दुपारी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळचे गुजरात येथील सर्वोदयी कार्यकर्ते व परंधाम प्रकाशनाचे व्यवस्थापक दिवंगत रणजितभाई देसाई आणि बिहार येथील बिंदीबेन यांची एकुलती एक मुलगी असलेल्या करुणाताई आचार्य विनोबा भावे यांच्या मानसकन्या म्हणून गांधीजन परिवारात परिचित होत्या. पवनार येथील परंधाम आश्रमातच आचार्य विनोबांच्या सान्निध्यात त्यांची जडणघडण झाली होती. त्यांनी कोणतेही औपचारिक शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेतले नसले तरी मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषा त्यांना अवगत होत्या. विनोबांच्या मार्गदर्शनात त्यांचे कताई, विणाई, गणित, लेखन, प्रूफ रीडिंग, प्रकाशन, शेती, गोपालन अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण झाले होते.
करुणा फुटाणे यांच्या सामाजिक चळवळीतील सहभागाची सुरुवात जयप्रकाश नारायण यांच्या तरुण शांतिसेनेपासून झाली. रवाळा येथील वसंत फुटाणे या ध्येयवादी तरुणासोबत सहजीवनाची सुरुवात झाल्यानंतर नव्वदच्या दशकात त्यांनी सेंद्रिय शेती, पर्यावरणस्नेही जीवनपद्धती, ग्रामीण महिलांचे संघटन, लोकशिक्षणासाठी सार्वजनिक वाचनालय यासारखे अनेक उपक्रम सार्वजनिक स्तरावर अत्यंत निष्ठेने राबविले. रवाळा परिसरातील ग्रामीण महिलांना सोबत घेऊन त्यांनी अनेक वर्षे दारूबंदी आंदोलनही चालविले.
२००८ मध्ये ग्रामसेवा मंडळात निर्माण झालेल्या आकस्मिक परिस्थितीमुळे मुले लहान असतानाही कौटुंबिक बाब बाजूला सारून संस्थेच्या हितासाठी ग्रामसेवा मंडळाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यातून खादीक्षेत्रातील तसेच स्थानिक संस्थेसोबत देश-विदेशातील इतर संस्था व व्यक्तींना जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. त्यांचा मुलगा चिन्मयने पानी फाउंडेशनसोबत जलसंधारण आणि लोकसहभाग यासाठी विदर्भाची जबाबदारी स्वीकारली असताना त्याला वैचारिक आणि संस्थागत बळ देण्याची जबाबदारीही करुणाताईंनी सामाजिक दायित्वाच्या आणि मातृत्वाच्या भावनेतून पार पाडली होती. सेवाग्रामचे आनंद निकेतन, दत्तपूर येथील महारोगी सेवा समिती, मगन संग्रहालय, धरामित्र, आदी स्थानिक संस्थांसोबतच राज्यातील अनेक संस्था व संघटनांच्या त्या पदाधिकारी होत्या.