सतीश नरहरशेट्टीवारची रवानगी न्यायालयीन कोठडीत
By admin | Published: December 25, 2016 02:17 AM2016-12-25T02:17:00+5:302016-12-25T02:17:00+5:30
येथील भू-माफिया सतीश नरहरशेट्टीवार याची पोलीस कोठडी शनिवारी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले
रविवारी सेलू पोलिसांना ताबा : इतर ठाण्यांकडूनही मागणी
वर्धा : येथील भू-माफिया सतीश नरहरशेट्टीवार याची पोलीस कोठडी शनिवारी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी सात दिवसांकरिता न्यायालयातील कोठडीत केली आहे. नरहरशेट्टीवार विरोधात गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांनी त्याच्या ताब्याची मागणी केली असल्याने उद्या रविवारी त्याला सेलू पोलिसांच्या स्वाधीन करावे, असा निर्णय झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
बनावट एनए व बनावट विक्रीपत्राच्या आधारे सर्वसामान्यांना तर एकाच जमिनीच्या कागदावर चार बँकांतून कर्जाची उचल करणाऱ्या सतीश नरहरशेट्टीवारला सावंगी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती आज संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सतीश नरहरशेट्टीवार याच्यावर केवळ सावंगी नाही तर सेलू, खरांगणा, वाशिम व अकोला ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. या पोलिसांकडून न्यायालयात त्याचा ताबा मागण्यात आला होता. त्यावर वर्धा न्यायालयाने निर्णय घेतला असून त्याला रविवारी सेलू पोलिसांच्या स्वाधीन करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. वर्धेनंतर येथील गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी शुक्रवारी त्याच्या नागपूर स्थित घराची झडती घेतली असता येथूनही मोठ्या प्रमाणात बनावट एनए जप्त करण्यात आले. या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या गोरखनाथ चौधरी याच्या घरातही बनावट एनए मिळून आले आहे. या प्रकरणात आवश्यक असलेले कागदपत्र हाती आल्याने आता नरहरशेट्टीवार याचा ताबा नसला तरी प्रकरणात न्यायसिद्धी होण्यास मदत होईल, असे ठाणेदारांनी सांगितेले.(प्रतिनिधी)