दिल्ली येथे अहिंसा, अराजकीय व असंप्रदायिक तत्त्वावर सत्याग्रह
By admin | Published: September 25, 2016 02:12 AM2016-09-25T02:12:21+5:302016-09-25T02:12:21+5:30
संपूर्ण गोवंश हत्याबंदी आणि मांस निर्यात बंदी या दोन मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सत्याग्रह सुरू आहे.
सुगन बरंठ : नई तालीममध्ये कार्यकर्ता बैठक
सेवाग्राम : संपूर्ण गोवंश हत्याबंदी आणि मांस निर्यात बंदी या दोन मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सत्याग्रह सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. आता केंद्र सरकारची जबाबदारी आहे. त्या मागण्या मान्य करण्यासाठी अहिंसा, अराजकीय व असांप्रदायिक तत्वावर सत्याग्रह सुरू असल्याचे गोवंश रक्षा अभियानचे डॉ. सुगन बरंठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नई तालीम समिती कार्यालयात गोवंश रक्षा अभियानच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, अण्णा जाधव, शंकर बगाडे, प्रसाद प्रशांत गुजर आदी उपस्थित होते. डॉ. बरंठ यांनी आॅगस्ट महिन्यात पवनार आश्रममध्ये बैठक झाली व दिल्लीत सत्याग्रह सुरू झाला. मुंबई येथे बांद्रा व देवनार कत्तल खान्याजवळ संपूर्ण गोवंश हत्या बंदीसाठी ३३ वर्षे ३ महिने सत्याग्रह पू. विनोबाजींच्या विचार व तत्वानुसार झाला. राज्य शासनाने कायदा केल्याने गोवंश प्रेमी तसेच कृषी व्यवस्था व अर्थव्यवस्थेचा अभ्यासकांना दिलासा मिळाला; पण केंद्र शासनाचे काय, असा प्रश्न निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले. गांधी, विनोबांची भूमिका समाज वैकल्पिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची आहे. उच्चस्तरीय समितीत ज्येष्ठ गांधीवादी माजी कुलपती डॉ. रामजीसिंग, खुदाई खिदमदगारचे फैजल खान, महाविर त्यागी, अशोक शरण, राजस्थानच्या आशा बोभ्रा, आश्रम प्रतिष्ठान अध्यक्ष जयवंत मठकर आदींचा समावेश असल्याचे डॉ. बरंठ यांनी सांगितले.(वार्ताहर)