परचुरे शास्त्रींचा साबरमती ते सेवाग्रामपर्यतचा सत्याग्रही प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 06:00 AM2019-09-05T06:00:00+5:302019-09-05T06:00:23+5:30
संस्कृत तसेच वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही परचुरे शास्त्री यांनी कारावासही भोगला होता. त्यांचे ५ स्पटेंबर १९४५ रोजी दत्तपूर येथे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. यावर्षी त्यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : सेवाग्रामच्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून यात अनेकांचे योगदानही आहे. यामध्ये महात्मा गांधीसोबत स्वातंत्र्य चळवळीत साबरमती ते सेवाग्राम असा प्रवास करणारे परचुरे शास्त्री हे सुद्धा एक होते. त्यांची आज ७४ वी पुण्यतिथी या आश्रमात साजरी केली जाणार असून आश्रम परिसरातील त्यांच्या कुटीतून आजही स्मृतींचा उजाळा मिळतो.
संस्कृत तसेच वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही परचुरे शास्त्री यांनी कारावासही भोगला होता. त्यांचे ५ स्पटेंबर १९४५ रोजी दत्तपूर येथे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. यावर्षी त्यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी होत आहे. बापू कुटी परिसरातील त्यांची परचुरे कुटी आताही अभ्यासकांना विचाराचे बळ देतात. परचुरे शास्त्री या नावातच विद्वतेचे धनी असल्याचे ज्ञान आपल्याला होते. त्यांचे ज्ञान, योगदान आणि कार्य पाहता आपोआपच आपले मस्तक श्रद्धेने झुकल्याशिवाय राहत नाही. साबरमती आश्रमात ते गांधीजीसोबत कार्य करायचे. अशातच त्यांना कुष्ठरोग झाल्याने आश्रमातच त्यांची वेगळी व्यवस्था करून देण्यात आली. पण, दैनिक कार्य मात्र त्यांनी कधीच टाळले नाही. साबरमती आश्रमचे विसर्जन केल्यानंतर ते महाराष्ट्रात परत आले.
शास्त्रीजी वेदशास्त्र संपन्न गृहस्थ होते.ज्ञानाचा प्रभाव त्यांच्या जीवनातून दिसून येत असे. ज्ञानी माणूस आपल्या जीवनात नेहमीच अन्यायाशी लढण्यास सदैव तयार असतो. शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर परिणाम करणाऱ्या मुळशी व कोयना धरणाच्या बांधासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. त्यांनी लहान-मोठ्या खेड्यातील लोकांच्या प्रगतीसाठी कार्य सुरू केल्याने लोकांनी त्यांना ‘ग्रामसेवक परचुरे शास्त्री’ असे नाव दिले. परचुरे शास्त्री यांनी स्वत: ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. जो पर्यंत खेड्यातील लोकं निर्भय आणि निर्व्यसनी बनणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही, असे ते म्हणत.
देशाला स्वातंत्र्य मिळावे अशी अपेक्षा ठेवणाºया युवकांना त्यांनी दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून काही बोध घेतला पाहिजे. गुलामगिरीचे शिक्षण देणारी पध्दती; मग ती भारतीय शिक्षकाकडून मिळणारी असेल तरी ती सोडून दिली पाहिजे. रचनात्मक कार्य, स्वदेशीव्रताचे पालन करायला शिकावे, असे आवाहन त्यांनी केले होते. कुष्ठरोग होण्याच्या अगोदर आणि कुष्ठरोग झाल्यानंतरही सत्याग्रह, चळवळीसाठी कारावास भोगला. यादरम्यान तुरुंगात त्यांची रविंद्रनाथ टागोर यांच्याशी भेट झाली होती. कताई आणि रचनात्मक कार्यावर अखेरपर्यंत निष्ठा कायम राहिली. आजारपणातही आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. गांधीजींच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. यात त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे. आजार बळावल्याने मात्र त्यांना परिवारासोबत, समाजात राहणे कठीण झाले. शास्त्रींना जनावरांच्या गोठ्यात, झाडाखाली राहण्याची वेळ आली. सामाजिक तिरस्कार आणि आर्थिकतेचा सामना करणे अवघड झाल्याने बापूंचे स्मरण व्हायला लागले. तेच आधार देतील असा विश्वास त्यांना वाटू लागला.
सेवाग्राममध्ये बापूंनी आश्रमची स्थापन केली अशी त्यांना माहिती मिळाली आणि सेवाग्राम आश्रमची वाट धरली. आश्रमच्या समोरील एका झाडाखाली ते बसून असल्याचे मीरा बहन यांना दिसले. त्यांनी ही गोष्ट बापूंना सांगितली. गांधीजींनी त्यांची भेट घेतली. सायंकाळच्या प्रार्थनेनंतर बापूंनी आश्रमवासियांसोबत परचुरे शास्त्री विषयी चर्चा केली. आश्रमात कार्यकर्ते असल्याने कुष्ठरोगीला ठेवायचे कसे हा मोठा प्रश्न होता. सर्वांनी त्यांना दूर लोटले होते. पण, ते एक कार्यकर्ता होते. त्यांचा त्याग गांधीजी करू शकले नाही आणि आश्रमातील एका बाजूला त्यांच्या राहण्यासाठी मुन्नालालजींनी एक कुटी तयार केली. तेथेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. बापू नियमित त्यांची सेवा करीत. आजारात जगणे कठीन वाटायला लागल्याने एकदा मरणाची ईच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी उपवास सुरू केला पण, त्यांना बरे वाटायला लागल्याने उपवास बापूंच्या हातानी सोडला. स्वातंत्र्य चळवळीत बापूंना आश्रमच्या बाहेर जावे लागले. त्यामुळे त्यांची जबाबदारी मनोहर दिवाण यांना देऊन दत्तपूर येथे ठेवले. आश्रमातील दोन वर्षाच्या मुक्कामानंतर दत्तपूर येथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.