सत्यनारायण पूजा साहित्याच्या विसर्जनासाठी गेले होते नदीवर; पत्नीपाठोपाठ पतीलाही जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 06:23 PM2022-06-15T18:23:10+5:302022-06-15T18:36:53+5:30
Wardha News सत्यनारायणाच्या पूजेतील साहित्य धाम नदीपात्रात विसर्जित करताना पत्नी पाण्यात बुडाली, तिला वाचविण्यासाठी पतीनेही पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
वर्धा : सत्यनारायणाच्या पूजेतील साहित्य धाम नदीपात्रात विसर्जित करताना पत्नी पाण्यात बुडाली, तिला वाचविण्यासाठी पतीनेही पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास साकुर्ली धानोली येथे घडली. दोघांचेही मृतदेह सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नदीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेने तरोडा गावात शोककळा पसरली आहे. आत्माराम कृष्णा बोरकर (५५), कुंदा आत्माराम बोरकर (४५) दोन्ही रा. तरोडा, अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आत्माराम यांच्या मुलाचे सात ते आठ दिवसापूर्वी लग्न झाले. त्यानिमित्त त्यांनी घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. पूजेतील साहित्य विसर्जित करण्यासाठी आत्माराम आणि त्यांची पत्नी साकुर्ली येथील धाम नदीवर गेले होते. पूजेचे साहित्य नदीपात्रात विसर्जित करीत असताना पत्नीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. पत्नीला पाण्यात बुडताना पाहून पती आत्माराम तिला बाहेर काढण्यासाठी धडपड करू लागला. पण, कुणीच मदतीला न धावल्याने आत्मारामने थेट नदीपात्रात उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने पतीपत्नी दोघेही नदीत बुडाले.
घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट येथील पोलीस निरीक्षक के. एम. पुंडकर, संदीप मेंढे, विजय काळे यांनी घटनास्थळी जाऊन सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. या घटनेने तरोडा गावात शाेकाकुल वातावरण पसरले होते.