खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या तुटवड्याचे सावट
By admin | Published: April 19, 2015 02:00 AM2015-04-19T02:00:02+5:302015-04-19T02:00:02+5:30
यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे नुकसान सहन करावे लागले.
वर्धा : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने मारलेल्या दडीमुळे नुकसान सहन करावे लागले. या पावसाचा फटका बसल्याने जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा कमी झाला. परिणाती उत्पन्नात घट झाली. त्याचा परिणाम सोयाबीनच्या बियाण्यावर होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. येत्या खरीप हंगामात सोयाबीनचे बियाणे मिळणे कठीण होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीनचे बियाने जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोयाबीन हे स्वपरासिंचित पीक आहे. या पिकाचे सर्व वाण सरळ आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. म्हणून शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यासाठी मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणून शेतकऱ्यांना वापरता येवू शकतात. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास बियाणे खर्चात बचत होईल. बियाणे साठवताना बियाणाच्या आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सोयाबीन बियाणे अत्यंत नाजूक आहे. या बियाण्यांना इजा झाल्यास त्याचा परिणात उगवण क्षमतेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बियाणे साठवताना पोत्यांची थप्पी सहा ते आठ थरांची किंवा सात फुटांपेक्षा जास्त नसावी, असेही कृषी विभागाच्यावतीने कळविले आहे. शेतकऱ्यांनी स्वत: कडील बियाणे वापरण्यासाठी या उपायांचा अवलंब करावा, असे पुण्याच्या कृषी आयुक्तांनी कळविले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसल्याने अडचण जात आहे. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या घरचे सोयाबीन बाजारात
बियाण्यांची कमतरता जाणवण्याचे भाकीत कृषी विभागागाच्यावतीने करण्यात आले आहे. वास्तविकतेत आजच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन नाही. त्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन विकले आहे. यामुळे त्यांची पंचायईत होणार असल्याचे चित्र आहे.
कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेले भाकित बियाणे विक्रेत्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. बियाण्यांची कमतरता असण्याचे चित्र निर्माण झाल्याने त्यांच्याकडून सोयाबीनच्या बियाण्यांचा काळाबाजार करण्याच्या हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.