सावंगी ठाणेदाराकडून जि. प. उपाध्यक्षांना अपमानास्पद वागणूक
By admin | Published: December 31, 2016 01:57 AM2016-12-31T01:57:27+5:302016-12-31T01:57:27+5:30
सावंगी (मेघे) परिसरात सुरू असलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गुरुवारी सायंकाळी सावंगीच्या सरपंचाचे
विलास कांबळेंना जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण : तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते ठाण्यात
वर्धा : सावंगी (मेघे) परिसरात सुरू असलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गुरुवारी सायंकाळी सावंगीच्या सरपंचाचे पती किशोर दौड व त्याच्या काही सहकाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची रीतसर तक्रार देण्याकरिता सावंगी पोलीस ठाण्यात गेलो असता ठाणेदार संतोष शेगावकर यांनी चक्क दारूड्या म्हणून गेट आऊट म्हटले. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, याप्रकरणी सदर ठाणेदाराच्या उद्दामपणाला चार दिवसात लगाम लावा अन्यथा कायदेशीर मागार्ने आंदोलन करणार, असा इशारा जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांना निवेदन देत चर्चा केली. यावेळी सावंगी येथील ठाणेदार शेगावकर यांची सावंगी येथून उचलबांगडी करण्याची मागणी केल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला जि.प. सदस्य राणा रणनवरे यांची उपस्थित होते. त्यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला.
विलास व किशोर दौडवर अनेक गुन्हे
४या प्रकरणात असलेला विलास दौड याच्यावर भादंविच्या ४५७, ४३६, ३२५, ३४, ४२०, ४४८, ४२७, ३२४, ३४ तसेच मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहे. तर किशोर दौडवर ३२४, ३४१, १४३, ३९४, ५०६, ४२, १४७, १४८, १४९, ३०७ ३२३, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. असे असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. दौड आणि ठाणेदार यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचा गंभीर आरोपही यावेळी कांबळे यांनी केला.
ठाणेदाराची गुन्हेगारी प्रवृत्तीला अशीही साथ
४सावंगी (मेघे) येथे पोलीस ठाणे येण्यापूर्वी हा परिसर सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत होता. सेवाग्रामचे तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे यांनी दौड यांच्या आशीर्वाद हॉटेलात धाड घालून लाखो रूपयांची दारू जप्त केली होती. येथे अद्यापही दारू विक्री होत असताना सावंगी ठाणेदारांनी मात्र गेल्या वर्षभरात एकही कारवाई केली नाही. उलट खुद्द ठाणेदारच त्या हॉटेलात त्यांना बसून अनेकांनी बघितले आहे, असा गंभीर आरोप विलास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला.
पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांवर अदखलपात्र गुन्हा
४या प्रकरणात आलेल्या दोन्ही तक्रारीवरून एकमेकांविरूद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनाही समज देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.