संजूने दिले हजारो सापांना जीवदान

By admin | Published: August 14, 2016 01:55 AM2016-08-14T01:55:54+5:302016-08-14T01:55:54+5:30

साप म्हटले की अनेकांची बोबडी वळल्याशिवाय राहात नाही. त्यामुळेच साप दिसला की त्याला आधी मारून टाकण्याकडे नागरिकांचा कल असतो.

Save the thousands snakes | संजूने दिले हजारो सापांना जीवदान

संजूने दिले हजारो सापांना जीवदान

Next

नाग आणि अजगरांचाही समावेश : ३८ वर्षांपासून देतोय सर्पमित्र म्हणून सेवा
विजय मानकर सालेकसा
साप म्हटले की अनेकांची बोबडी वळल्याशिवाय राहात नाही. त्यामुळेच साप दिसला की त्याला आधी मारून टाकण्याकडे नागरिकांचा कल असतो. मात्र सापांना मारू नका, तो निसर्गाचा समतोल राखण्यासाठी माणसाचा मित्रच आहे असा संदेश देत सालेकसा येथील सर्पमित्र संजू शेंद्रे मागील ३८ वर्षांपासून सापांना पकडून जीवदान देण्याचे काम करीत आहे.
जिल्ह्यातील प्रमुख सर्पमित्रापैकी एक असलेल्या संजू शेंद्रे यांनी ३८ वर्षात हजारो विषारी आणि बिनविषारी सापांना पकडून जीवदान दिले आहे. विशेष म्हणजे दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून सेवा देत असताना त्यांनी हे समाजकार्य अविरत सुरू ठेवले आहे.
संजू चांद शेंद्रे यांना सापांना पकडून त्यांना जंगलात सोडण्याचा छंद बालपणापासूनच जडला आहे. त्यामुळे ते आपली नोकरी सांभाळून हा चंद जोपासत आहेत. कोणत्याही अडचणीत दडलेल्या सापाला पकडण्याचा त्यांचा हातखंडा आहे. या धाडसी कामातून त्यांनी अनेक लोकांना सापाच्या दहशतीतून बाहेर काढून सुटकेचा श्वास घेण्यासाठी मोकळे केले आहे.
एका अर्थाने संजु शेंद्रे सापाला जीवदान तर देतातच पण माणसांना सापाबद्दल आदर बाळगायला शिकवितात. आतापर्यंत जीवदान दिलेल्या सापांमध्ये सर्वाधिक नाग जातीच्या सापांचा समावेश आहे. याशिवाय अजगर, मन्यार, घोणस या विषारी सापांनाही पकडून जंगलात नेवून सोडले. अनेक साप गडमाता पहाडीच्या मागच्या घनदाट जंगलात नेऊन सोडलेत. या जंगलात त्यांनी अजगरही सोडले आहेत.
साप पकडण्यात धिट झाल्यानंतर संजू नागसारखे विषारी सापसुद्धा पकडू लागला. आज कोणत्याही सापाला पकडण्यासाठी गेले असता संजु त्या सापाच्या जवळ गेला की तो पळ काढण्याऐवजी जागेवर थांबून शरणागती पत्करतो. इतक्या वर्षात संजूला फक्त एक वेळा नाग सापाने हाताला दंश केला होता. परंतु त्वरित जंगलातील आयुर्वेदिक औषधीचे सेवन केल्याने विष शरीरात गेले नाही. मात्र दंश केलेल्या ठिकाणी आजही हाताला खुणा दिसत आहेत.

असा लागला सापाचा छंद
संजू यांना साप पकडण्याचा छंद कसा लागला याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, लहानपनी मित्राबरोबर खेळत असताना त्यांच्या खेळाच्या ठिकाणी वास्या, ढोंड्या यासारखे साप वावरताना दिसायचे. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या खेळात व्यत्यय निर्माण होत होता. अशावेळी मित्र खेळ सोडून पळून जायचे. अशात संजू त्यांना धाडस देत असते. साप कधी धावून चावत नाही. तसेच हे साप चावल्यास काही होत नाही. दरम्यान ते मित्रासमोर साप पकडून खिशात टाकून दाखवत असे.
अन् शिक्षकाची घाबरगुंडी उडाली
चौथ्या वर्गात शिकत असताना अनेकदा खिशात साप पकडून तो शाळेत सुद्धा नेला. एकदा परीक्षा देत असतात शर्टच्या खिशात साप ठेवून पेपर सोडवत होता. एवढ्यात त्याच्याजवळ शिक्षक आले असता खिशातील साप शिक्षकाला डोकावताना दिसला. हे दृष्य बघून शिक्षक घाबरले आणि मुलेही घाबरली. त्या शिक्षकाने संजुची तक्रार त्याच्या वडिलाकडे केली. तेव्हा संजुने शाळेत साप घेऊन जाणे बंद केले. परंतु साप पकडले बंद केले नाही.

Web Title: Save the thousands snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.