अन् रस्त्याची झाली चाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 10:05 PM2017-08-30T22:05:37+5:302017-08-30T22:06:54+5:30
शहरातील हृदयस्थान अशी ओळख असलेल्या वंजारी चौक ते गजानन सायकल स्टोअर्स या रामनगर पोलीस ठाण्याच्या मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षश: चाळणी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील हृदयस्थान अशी ओळख असलेल्या वंजारी चौक ते गजानन सायकल स्टोअर्स या रामनगर पोलीस ठाण्याच्या मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षश: चाळणी झाली आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी नाली नसून पावसाळ्याच्या दिवसात येथे पाणी साचून रस्त्याला चक्क तळ्याचे स्वरूप येते. याकडे स्थानिक नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी आहे.
वाढता गुन्ह्याचा आलेख लक्षात घेता वर्धा शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करून रामनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. वंचारी चौक ते गजानन सायकल स्टोअर्स या मार्गावरील महाराणा प्रताप शाळेच्या आवारात सदर पोलीस स्टेशन सध्या कार्यरत आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या मार्गावर दिवसभर छोट्या-मोठ्या वाहनांची बºयापैकी वर्दळ असते. परंतु, सध्या याच मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले असून या मार्गावरून खड्डा चुकवून पुढील प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास सदर रस्त्यावरील खड्डे सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. रस्त्याच्या दुतर्फा नालीच नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, या मार्गाने पायी ये-जा करणाºयांनाही चिखल तुडवतच नियोजित ठिकाणी जावे लागते. याच परिसरात चार शाळा आहेत. सदर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही खड्ड्यांमुळे चाळणी झालेल्या रस्त्याचा फटका सहन करावा लागत आहे. वाहनचालकांसह नागरिक व विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग व न.प. बांधकाम विभागाने पुढाकार घेत रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी आहे.
शाळकरी मुला-मुलींची वाढविली डोकेदुखी
रामनगर पोलीस ठाण्याच्या मार्गावर कमला नेहरू कन्या विद्यालय, महाराणा प्रताप शाळा, जगजीवनराम शाळा व एक कॉन्व्हेंट आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात चिखल तुडवतच शाळेत ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून भरधाव वाहने इतरांची पर्वा न करता खड्ड्यांमधील पाणी उडवत जातात. खड्ड्यांमधील गढूळ पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर उडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. एकूणच चाळणी झालेल्या रस्त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गावर खड्डेचखड्डे
पुलगाव : नागपूर-मुंबई दरम्यान अंतर कमी होवून कमी वेळात वाहनाने मुंबईला पोहचता यावे यासाठी मुंबई औरंगाबाद नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचा निर्णय २३ डिसेंबर १९९९ च्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शासन निर्णय १५ जून २००२ अन्वये या प्रकल्पातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला उद्योजक म्हणून घोषीतही करण्यात आले. हा मार्ग विदर्भ मराठवाड्यातील बºयाचश: अविकसित भागातून जाणार असला तरी या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. परिणामी, मोठ्या अपघातास नियंत्रण मिळत आहे. नागपूर ते घोटी या मार्गाची लांबी सुमारे ७०० कि़मी. असून या प्रकल्पावर जवळपास ७०० कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. हा मार्ग नागपूर-बुटीबोरी-वर्धा-पुलगाव-तळेगाव-शिंगणापूर-कारंजा-मालेगाव-मेहकर-शिंदखेडराजा-जालना-औरंगाबाद-वैजापूर-सिन्नर-घोटी-शहापूर होत मुंबई या शहरातून जातो. या मार्गामुळे नागपूर-मुंबई हे अंतर ५० कि.मी.ने कमी होत आहे. हा मार्ग अनेक औद्यागिक शहरांना जोडणारा आहे. या मार्गाचा बहुतांश भाग चौपदरी होणार असल्याचा गाजावाजाही झाला होता. या विकास कामात हजारो वृक्षही तोडण्यात आली. पण, सध्या या मार्गावरील जीवघेणे खड्डे वाहनचालकांची डोकेदुखी वाढवत आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक अपघात झाल्याची बरीच उदाहाणे आहेत. या मार्गावरील अनेक ठिकाणची गिट्टी उघडी पडली असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी आवश्यक असलेले सूचना फलक लावलेले नाहीत. खड्डेमय झालेल्या या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी संबंधीत प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.