साबाजी जिनिंगच्या आगीची धग कायम
By admin | Published: May 8, 2014 02:09 AM2014-05-08T02:09:09+5:302014-05-08T02:09:09+5:30
स्थानिक साबाजी जिनिंग फॅक्टरीला लागलेल्या आगीची धग २४ तासांच्या प्रयत्नानंतर अजूनही कायम आहे.
नुकसान ३ कोटी २५ लाखांचे : दिवसभर कापूस उखरुन आग शांत करण्याचा प्रयत्न
देवळी : स्थानिक साबाजी जिनिंग फॅक्टरीला लागलेल्या आगीची धग २४ तासांच्या प्रयत्नानंतर अजूनही कायम आहे. अग्निशामक दलाच्या सहा गाड्यांनी रात्रभर चालविलेल्या मोहिमेनंतर ही आग नियंत्रणात आली. तसेच बुधवारी दिवसभर जेसीबीच्या सहाय्याने कापूस उखरुन आग शांत करण्याचे काम सुरुच होते. यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या व कर्मचारी कार्यरत होते.
आग लागल्यानंतर दीड तासांपर्यंत अग्निशामक दलाची कोणतीही गाडी उपलब्ध न झाल्यामुळे आगीने रुद्र रुप धारण करुन मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. यामध्ये ३ गंजीवरील २ हजार २00 क्विंटल कापूस तसेच गोदामातील १ हजार रुई गाठी जळून खाक झाल्या. बाजार मुल्याप्रमाणे रुई गाठीच्या प्रती खंडीची किंमत ४३ हजार रुपये आहे. तसेच २ गाठी मिळून १ खंडीचे वजन होत असल्याने रुई गाठीचे २ कोटी १५ लाख तसेच गंजीवरील कापसाचे १ कोटी १0 लाखांचे नुकसान झाले. गंजीवरील कापूस दीडफुट खोलपर्यंत जळाला. तसेच पाण्यामुळे खराब झाल्यामुळे त्याची किंमत अध्र्यावर येऊन झळ पोहचली. या जिनिंगचा कोटींचा विमा असल्याचे सांगितले जात आहे. मागील काही वर्षातील ही सर्वात मोठी आग असल्याचे बोलले जात आहे. परिसरातील व्यापारी जीन मालकासह कामगारांनी आपली घरे खाली केली होती.(प्रतिनिधी)