आर्वीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३२ लाखांचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:31 IST2025-04-11T18:29:52+5:302025-04-11T18:31:28+5:30
संचालक गजानन निकम यांचा आरोप : पत्रकार परिषदेतून दिली माहिती

Scam of Rs 32 lakhs in Arvi's Agricultural Produce Market Committee
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने तोलाईमध्ये अंदाजे ३२ लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. यामुळे समितीचे कोटी रुपयांच्या बाजार शुल्काचे नुकसान झाले आहे. तसेच बाजार समिती, कास्तकारी खरेदी विक्री संस्था, शेतकरी जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन निकम यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेतून केला.
आर्वीच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामभाऊ कुमटे, जनार्दन जगताप, प्रभाकर टोपले, मधुकर सोमकुवर, मनीष उभाड, रणजित देशमुख, हर्षराज जगताप, नाना राठोड, जया देवकर, सचिन वैद्य, तुळशीराम सोमकुवर, अविनाश बोबडे आदींची उपस्थिती होती. समितीचे सभापती कापूस व्यापाऱ्यांना १०० टक्क्यांपैकी फक्त ३० टक्के बाजार शुल्क आकारून ७० टक्के सूट देऊन व्यापाऱ्यांपासून रोखीने आर्थिक लाभ मिळवित असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यामुळे ८ एप्रिलला संचालक या नात्याने स्वतः कापूस जिनिंगमध्ये तपासणी केली असता, समितीच्या रेकॉर्डवर कापूस खरेदी कमी दाखवित असून, व्यापाऱ्यांना सूट देत आहे. अशा प्रकारातून केवळ तोलाई शुल्कात अंदाजे ३२ लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. सभापतींचे विश्वासपात्र कर्मचारी सहसचिव विशाल येलेकर व हंगामी कर्मचारी सिद्धार्थ कांबळे हे गैरव्यवहार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. या गैरव्यवहारमुळे समिती क्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समिती हिशोब पट्टी मिळत नाही. स्वतः मुख्य प्रवर्तक असलेल्या सूतगिरणीला पदाचा गैरवापर करून बाजार समिती, आर्वीकडून ३५ लाख रुपये गुंतवून आर्थिक लाभ मिळविण्याचा हेतू असल्याचेही संचालक निकम म्हणाले.
संस्थेची जागा भाड्याने देऊन केलाय भूखंड घोटाळा
नझूलद्वारे भाडेतत्त्वावर मिळालेली जागा स्वमालकीची समजून जुनी इमारत जमीनदोस्त करून व्यापारी हिताचे दुकाने अथवा बांधकाम करण्याचे नियोजित केले आहे. त्या बांधकामाकरिता त्यांनी मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून रक्कम गोळा केलेली आहे. नझूलच्या जागेवर स्वतः पदाधिकारी असलेल्या कृषक शिक्षण संस्था, आर्वी नागरी सहकारी पतसंस्था तसेच इतर व्यावसायिकांना नियमबाह्य पोटभाडेकरू कसे ठेवले? असा प्रश्न निकम यांनी उपस्थित करून संस्था स्वतःच्या मालकीची समजून दीर्घ मुदतीकरिता जागा भाड्याने देण्यात येतात व त्यातून आर्थिक लाभ मिळवून भूखंड घोटाळाही केल्याचे म्हटले आहे.
कर्मचारी भरतीतसह भाड्यातही गडबड
शेतकरी जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड, आर्वी येथे भूखंड घोटाळा करून अटी पूर्ण न करता दीर्घ मुदतीवर जागा भाड्याने देण्यात येतात. भाडेधारकाकडून प्रत्यक्ष भाडे संस्थेस व अप्रत्यक्ष भाडे रोखीने वसूल केल्या जाते. याची चौकशी होणे आवश्यक आहे. कर्मचारी वाटेल तेव्हा काढून टाकले जातात, त्यांना अंतिम लाभ दिल्या जात नाही. तसेच कर्मचारी भरती प्रक्रिया न राबविता स्वतःच्या नातेवाइकांना व्यवस्थापकपदी नियुक्त करून दोन्ही संस्थेतून पगार देत असल्याचे सांगितले.
"आर्वी तहसील सहकारी कास्तकारी खरेदी विक्री संस्था, जिनिंग प्रेसिंग आर्वी, कृषी उत्पन्न बाजार समिती या माझ्याशी संबंधित असणाऱ्या तिन्ही संस्थांमध्ये गैरप्रकार किंवा कुठलीही अनियमितता नाही. सुतगिरणीचे जमा करीत असलेले भागभांडवल नियमांच्या अधिन राहूनच आहे. संस्थेवर व माझ्यावर हे आरोप राजकीय हेतुने प्रेरीत होऊन आकसापोटी केले जात आहे. मी सध्या महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे या आरोपांसदर्भात सविस्तर खुलासा करु शकत नाही. पण, १५ एप्रिलनंतर आर्वीत परतल्यावर केलेल्या आरोपाबाबत सर्व माहिती देऊन या आरोपावर उत्तर दिले जाईल."
- संदीप काळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.
"प्रभारी सचिवांनी माझ्याकडे शेतमाल आवक व्यवस्थापनाचे काम सोपवले आहे. बाजार समितीने विक्रमी सव्वा दोन लाख क्विंटल धान्याची आवक स्वीकारली. तसेच कापसाचीही अधिक आवक झाली आहे. बाजार समितीचे उत्पन्न लाखांतून कोटीमध्ये पोहोचले आहे. जर गैरव्यवहार झाला असता तर बाजार समितीचे उत्पन्न वाढले असते का? संचालक मंडळाच्या वैचारिक मतभेदातून हे आरोप होत असल्याचा अंदाज आहे."
- विशाल येलेकर, सहसचिव, कृ.उ.बा.स