शालेय तपासणीला अधिकाऱ्यांकडून बगल
By admin | Published: May 9, 2017 01:08 AM2017-05-09T01:08:13+5:302017-05-09T01:08:13+5:30
शालेय तपासणी महिन्याला करणे बंधनकारक असताना अधिकाऱ्यांकडून याला बगल देण्यात येत आहे.
दुर्लक्ष : पोषण आहारातील धान्य बाजारात आल्याची शंका
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : शालेय तपासणी महिन्याला करणे बंधनकारक असताना अधिकाऱ्यांकडून याला बगल देण्यात येत आहे. यामुळे शालेय पोषण आहारातील धान्य थेट बाजारात येत असल्याचा आरोप पालकांनी केला. शाळांना प्राप्त होणारे धान्य आणि विद्यार्थ्यांना केलेले वाटप याचा ताळमेळ जुळत नसल्याचे तपासणीत आढळले. गटशिक्षणाधिकारी यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
येथील पंचायत समिती शिक्षण विभागाचा कारभार वाऱ्यावर असुन अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. शाळा तपासणी करीता अधिकरी जात नसून कागदावरच अहवाल स्विकारल्या जात आहे. शालेय पोषण आहारमधील धान्य खुल्या बाजारात येत असल्याने शिक्षण विभाग याबाबत अनभिज्ञ आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शालेय पोषण आहाराची तपासणी करताना त्यात अनेक त्रृटया आढळल्या. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे डोळेझाक केल्याचे दिसते. शासकीय निधीची गैरमार्गाने विल्हेवाट लावली जात असून यावर अंकुश लावण्याची मागणी आहे. येथील शालेय पोषण आहारात गौडबंगाल असल्याचे दिसून येते. विद्यार्थी संख्या कमी असताना जास्त प्रमाणात दाखविल्या जाते. शालेय शिक्षण खात्याकडून स्टेशनरी व पोषण आहार यासाठी निधी दिल्या जातो. मात्र यासाठी करावयाचा खर्च अनेकदा कागदोपत्री दाखविल्या जात आहे.
आष्टी तालुक्यातील शाळांमध्ये झालेल्या अफरातफरीची प्रकरण परस्पर मिटविण्याचे प्रकार घडले. शासनाचा निधी विद्यार्थी घटकासाठी वापरात येणे अपेक्षीत असताना यात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसते. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देऊन गैरप्रकाराला अंकुश लावण्याची मागणी पालक करीत आहे.
शाळा वर्गणीच्या पावत्यांवर नोंद नाही
लोकसहभागातून शाळांची रंगरंगोटी करा, त्यामधून विद्यार्थ्यांना शिक्षण वाढीस वाव मिळेल असे शिक्षण विभागाने धोरण ठरविले. मात्र ग्रामीण भागात लोकसहभागातून गोळा केलेल्या वर्गणीचा हिशोब शिक्षण विभागाकडे नसल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. वर्गणीच्या पावल्यांवर नंबर नाही. कुठेही नोंदणी नाही. मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसते.
शाळा तपासणी करण्याच्या नावाखाली अधिकारी वेळकाढुपणा करीत असल्याचे दिसते. शिक्षण विभागाने जागे होवून स्वच्छ प्रशासन चालविण्याची मागणी होत आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने सामाजिक उपक्रमाला सक्रीय सहभाग दाखवावा कागदावरचा कारभार हाकणे बंद करावे अशी मागणी पालकांनी केली आहे.
शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी शाळा तपासणी व आहार तपासणी केल्या जाते. काही ठिकाणी त्रुटी असू शकते. त्यासाठी पुन्हा तपासणी करायला सांगतो. शालेय पोषण आहारातील धान्य वितरणात गैरप्रकार आढळल्यास कारवाई करणार.
-व्ही.ए. दुबे, गटशिक्षणाधिकारी पं.स. आष्टी.