शाळा झाली कंत्राटदाराचे गोदाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:11 PM2017-11-13T23:11:12+5:302017-11-13T23:12:03+5:30
स्थानिक स्टेशन फैल भागातील शिवाजी प्राथमिक शाळा परिसरात कंत्राटदाराच्यावतीने मनमर्जीने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेवण्यात आले आहे.
ंलोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक स्टेशन फैल भागातील शिवाजी प्राथमिक शाळा परिसरात कंत्राटदाराच्यावतीने मनमर्जीने नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. याचा शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे. न. प. ची शाळा कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे व त्याकडे पालिकेच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदाराचे गोदाम होऊ पाहत असल्याने परिसरातील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी आहे.
शहरात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, त्यासाठी लागणारे मोठाले प्लास्टिक व लोखंडी पाईप कंत्राटदाराच्यावतीने स्टेशन फैल भागातील शिवाजी प्राथमिक शाळेच्या आवारात टाकण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. परिमाणी, खेळाडूवृत्तीला खो मिळत आहे. शाळा परिसरात टाकण्यात आलेले साहित्य एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारे ठरत आहे. काही नागरिकांनी शाळा परिसरातील साहित्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधींसह पालिका कर्मचाºयांना माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडूनही दुर्लक्षच करण्यात आल्याची परिसरात ओरड आहे. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा न.प.च्या वरिष्ठ अधिकाºयांनी तात्काळ योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.
साचलेल्या पाण्याच्या डबक्यात तयार होतात डास
जलकुंभाचा पाईप लिकेज असल्याने शाळा परिसरात ठिकठिकाणी पाणी साचत आहे. त्यात डासांची दिवसेंदिवस निर्मितीही होत असून हा प्रकार किटकजन्य आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. शिवाय जलकुंभाजवळ तयार करण्यात आलेल्या टाक्यावरील सिमेंटचे झाकण तुटले आहे. त्याच्या दुरूस्तीकडेही दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार एखाद्या अनुचित घटनेला आमंत्रण देत आहे. त्याची त्वरित दुरूस्ती गरजेची आहे.
लिकेजमुळे होतोय पाण्याचा अपव्यय
स्टेशनफैल भागातील शिवाजी प्राथमिक शाळेच्या आवारात जलकुंभ आहे. परंतु, जलकुंभाचा पाईप लिक असल्याने व त्याच्या दुरूस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने दररोज शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. सदर लिकेजची तात्काळ दुरूस्ती गरजेची आहे.
शाळा परिसरात ठेवण्यात आलेल्या साहित्याबाबत अद्याप कुणाचीही लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास कार्यवाही करण्यात येईल.
- एन. आर. नंदनवार सहाय्यक अभियंता, न. प. वर्धा.