माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या विकासाचे समाधान
By admin | Published: May 26, 2017 12:59 AM2017-05-26T00:59:41+5:302017-05-26T00:59:41+5:30
जीबीएमएम या शाळेचा दैदिप्यमान इतिहास आहे. या शाळेचे विध्यार्थी देश-विदेशात शहराचा लौकिक वाढवित आहे.
समीर कुणावार : शाळेला मिळणार नवी इमारत
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : जीबीएमएम या शाळेचा दैदिप्यमान इतिहास आहे. या शाळेचे विध्यार्थी देश-विदेशात शहराचा लौकिक वाढवित आहे. शहरातील नागरिकांना या शाळेबद्धल नितांत आदर आहे. शाळेची इमारत जीर्ण झाल्याने त्या जागेवर नवीन इमारत उभारून या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, हे माझे ध्येय होते. आता या शाळेची जीर्ण इमारत पाडून तेथे त्याच तोडीची ८ कोटी १५ लाख रुपये खर्चून नवीन इमारत उभी राहणार आहे. ध्येयपूर्तीचे समाधान माजी विद्यार्थी म्हणून मिळणार आहे, असे मत आ. समीर कुणावार यांनी व्यक्त केले.
नगर परिषदेद्वारे संचालित जीबीएमएम शाळेच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरूवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. रामदास तडस तर अतिथी म्हणून नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, न.प. उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, पं.स. सभापती गंगाधर कोळे, न.प. बांधकाम सभापती शुभांगी डोंगरे, शिक्षण सभापती रविला आखाडे, नगरसेवक रमेश धारकर, मुख्याधिकारी अनिल जगताप, भाजपचे भूपेंद्र शहाणे उपस्थित होते. आ. कुणावार यांनी मागील दोन वर्षांत शहरात आणलेल्या २०० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांची माहिती दिली. येत्या काळात शहरातील एकही काम अर्धवट राहणार नाही, असे प्रयत्न करणार आहे. जीबीएमएमला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षकांनी अधिक परिश्रम घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. मी आमदार म्हणून काम करीत असताना माझे गाव व जनतेचे ऋण फेडायचे, या भावनेने काम करीत आहे. कोणत्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खा. तडस यांनी आ. कुणावार यांच्या कार्यकाळाचा गौरव करताना महाराष्ट्रात कोणत्याही न.प. मध्ये झाली नाही एवढी कामे होत आहे. फडणवीस शासनाच्या कार्यकाळात विदर्भात विकास कामाचे चांगले दिवस आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी जीबीएमएम शाळेचे माजी विध्यार्थी व सध्या न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती राजेश तिवारी, न्या. आकाश वाशीमकर, न्या. दीपक भोला यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. चंद्रकांत देशपांडे, अॅड रवी मद्दलवार, अॅड. स्वप्नील धारकर, माजी आमदार डॉ. वसंत बोंडे, माजी प्राचार्य अमृत लोणारे, हरबनसिंग तिवारी, डोंगरवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.