शालेय मैदान बनले मद्यपींचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:12 AM2018-01-08T00:12:19+5:302018-01-08T00:12:32+5:30
शाळा हे संस्कारांचे केंद्र असते. शाळेच्या मैदानावर खेळाडू तयार होतात. मात्र ज्या शाळेच्या मैदानावर मद्याच्या शिश्या आणि तत्सम साहित्य आढळत असेल तर तेथील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : शाळा हे संस्कारांचे केंद्र असते. शाळेच्या मैदानावर खेळाडू तयार होतात. मात्र ज्या शाळेच्या मैदानावर मद्याच्या शिश्या आणि तत्सम साहित्य आढळत असेल तर तेथील विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. शाळा सुटल्यावर हमदापूर येथील शाळेचे मैदान मद्यपींचा ठिय्या बनले असते. शिक्षकांनी वारंवार तक्रार करूनही या मद्यपींचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश आले.
हमदापूर ही परिसरातील गावांची मुख्य बाजारपेठ आहे. शाळेचे येथे मोठे मैदान असून रस्त्याच्या बाजूलाच चहा, नाश्ताच्या टपऱ्या आहेत. येथे प्रवाशांची कायम गर्दी असते. शाळेचे मैदान सुद्धा दिवसा व सायंकाळी विद्यार्थी व खेळाडूंनी भरलेले असते. सायंकाळी खेळाडूंचा सराव झाल्यानंतर मैदान रिकामे होते. यानंतर आंबटशौकीनांचा येथे ठिय्या असतो. थंडीच्या काळात तर मद्यपींची येथे मैफल रंगते. मद्य रिचविल्यानंतर वस्तू उचलून ठेवण्याचे भान सुद्धा त्यांना नसते. दुसऱ्या दिवशी मात्र विद्यार्थ्यांची पंचाईत होते. ठिकठिकाणी रिकामे पॅकेट्स, कागद, शिश्या, प्लास्टिक ग्लास पडून असतात. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक या वस्तुंचा परिचय होतो. त्यांचा जिज्ञासा वाढताना दिसते, बरेचदा काचाच्या शिश्या फुटलेल्या असतात. त्यामुळे खेळताना विद्यार्थी जखमी होण्याचा धोका असतो. खेळाडूंना अनेकदा काचेचे तुकडे उचलावे लागतात.
शाळेत शिक्षण, खेळ, कला याचे ज्ञान मिळावे मात्र मैदानावरील हा प्रकार त्यांना बालवयातच वाममार्गाला लावणारा ठरतो अशी तक्रार पालक करतात. यावर कोणाचाच वचक नसल्याचे दिसते.
विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होण्याची भीती
शाळा, महाविद्यालयांमध्ये सध्या व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात असले तरी विद्येचे मंदिर असे संबोधल्या जाणाऱ्या शाळा परिसराच सध्या काही समाजकंटक दारू ढोसण्यासाठी बसत असल्याने व दारूच्या रिकाम्या शिश्या व इतर साहित्य तेथेच टाकून जात असल्याने विद्यार्थ्यांवर वाईट संस्कार होण्याची भीती बळावत आहे. आजचा विद्यार्थी उद्याच्या प्रगत भारताचे सुजान नागरिक असल्याने त्यांच्यावर कुठलेही वाईट संस्कार होऊ नयेत या हेतूने सुजान ग्रामस्थांनी एकत्र येत शाळा परिसरात दारूपिणाऱ्या मद्यपींना धडा शिकविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. शिवाय गावातील लोकप्रतिनिधींनीही एकत्र येत याकडे लक्ष देण्याची गरज आहे.