पहिल्याच दिवशी ठोकणार शाळेला कुलूप
By Admin | Published: June 26, 2016 01:58 AM2016-06-26T01:58:46+5:302016-06-26T01:58:46+5:30
तालुक्यातील धामकुंड येथील जिल्हा परिषद शाळेला सतत एक वर्षापासून मागणी करूनही शिक्षण विभागाने शिक्षक दिला नाही.
पालक संतप्त : मागणी करूनही जागा रिक्तच
कारंजा (घाडगे) : तालुक्यातील धामकुंड येथील जिल्हा परिषद शाळेला सतत एक वर्षापासून मागणी करूनही शिक्षण विभागाने शिक्षक दिला नाही. येत्या सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. या वर्षातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. यामुळे शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी शाळा उघडण्याच्या दिवशीच आपली मुले शाळेत ‘न’ पाठविता शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
धामकुंड गाव जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती गोपाल कालोकर यांचे आहे. त्यांनीही शाळेला शिक्षक देण्याची मागणी केली. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. या शाळेतील शिक्षकाचे पद रिक्तच राहणार असल्याचे चित्र कायमच आहे. जिल्हा परिषदेच्या धामकुंड येथील शाळेत पहिली ते पाचवी वर्ग आहे. शाळेची पटसंख्या २३ आहे. येथे शिक्षकांची दोन पदे मंजूर आहेत. पण गत एक वर्षापासून शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे.
यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी आणि जि.प. सदस्य कालोकर यांनी शिक्षणाधिकारी यांना एक शिक्षक मिळावा म्हणून निवेदन दिले. जि.प.च्या बैठकीमध्ये मागणीचा पाठपूरावा केला. तरीही शिक्षक दिला नाही. शिक्षकाच्या मागणीवरून टाळाटाळीची भूमिका घेत गावकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप गावकऱ्यांचा आहे. गत वर्षीचीच स्थिती याही वर्षी कायम राहण्याचे चित्र आहे. जिल्हा बदलीमध्ये एक शिक्षक देवू असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. पण बदली झालेला शिक्षक अद्याप धामकुंडला पोहचलाच नाही. त्यानंतर शिक्षण विभागाने दुसरी कोणतीच तरतुद केली नाही. यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी येथे काय होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)
जि.प.च्या दुर्लक्षामुळे शाळेवर दुर्दैवी वेळ
वर्ष लोटले पण अद्यापही धामकुंड शाळेला शिक्षक न दिल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. ही मागणी पूर्ण करण्याकरिता शाळेच्या पहिल्या दिवशीच शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दुर्देवी निर्णयाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.
पंचायत समिती स्तरावर जादा शिक्षक नसल्यामुळे शिक्षक देता आला नाही. पण शिक्षक देणे गरजेचे आहे. तसा अहवाल जि.प. शिक्षण विभागाला कळविला आहे. जिल्हा बदलीचे वेळेला शिक्षक दिल्या जाईल, असे जि.प. शिक्षण विभागाने कळविले होते.
- धनंजय उमेकर, गटशिक्षण अधिकारी, कारंजा (घाडगे)